Breaking News

सत्ता महापुरूषांच्या नावावर... रयतेला मात्र धतूरा

दि. 29, जून- कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र? असा पंधरा वर्षाच्या लोकशाही आघाडी सरकारच्या कारभारावर शंका घेणारा सवाल उपस्थित करून  समाजमनाच्या भावनांना  आवाहन केले. आणि तत्कालीन राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वाने विटलेल्या जनतेने विश्‍वासाने भाजपाच्या हाती राज्याचे सुकाणू दिले. भाजपाने  छत्रपतींच्या महाराष्ट्रात  छत्रपतींचाच हवाला देत कारभार करण्याचा शब्द दिला. या क्षणापर्यंत छत्रपतींच्या नावाचा जप भाजपाच्या थिंक टँक कडून सुरू असतांना  दिसतो आहे. तथापी छत्रपतींच्या रयतेच्या पदरात यथाशक्ती दान टाकण्यात मात्र ही मंडळी कंजूषी करत असल्याचा निष्कर्ष विद्यमान जनभावना अभ्यासल्यानंतर  लक्षात येते. हे चित्र का निर्माण झाले? सभोवताली घडत असलेल्या घटना कशाच्या निदर्शक आहेत?
बहुजन रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे राजा छञपती शिवाजी महाराज यांच्या जनाभिमुख राज्यकारभाराचा दाखला आज तिनशे साडेतिनशे वर्षानंतरही दिला  जातो.अगदी काल परवा पर्यंत महाराज या राज्याचा कारभार चालवित होते असा आभास व्हावा इतक्या या आठवणी ताज्या आहेत. याचाच अर्थ महाराजांच्या  कारभारात जन हिताशी कुठलीच तडजोड करण्यास तसुभरही वाव नव्हता.हे स्पष्ट होते.
या उलट महाराजांच्या महाराष्ट्रात प्रत्येक पातळीवर जनहिताशी तडजोड सुरू असल्याचे दुर्दैव नजरेस पडते. साठ सत्तर वर्षाच्या कारभाराचा मागोवा घेतल्यानंतर या  भुमीत कुठलाच घटक स्वतः सुरक्षित आणि समाधानी आहे असे मानीत नाही. कुठल्याही विचारधारेचे सरकार सत्तेवर असो, सामुहीक जनहित साधण्यार्‍या  मानसिकतेची उणिव कायम दिसते आहे.
सत्ता मिळवण्यासाठी छत्रपतींच्या आदर्शांचा वापर ,त्यानंतर कारभारावर रूष्ट होऊ पहाणार्या जनतेला भुल देण्यासाठी पुन्हा छञपतींच्याच नावाचा वापर करणारे  प्रत्येक वेळचे सत्ताधारी पारंगत झाल्याचा अनुभव रयतेने घेतला आहे.यावेळचे सत्ताधारी एक पाऊल पुढे असल्याचे चिञ पहायला मिळते आहे.त्याचे कारण स्पष्ट आहे.
आजपर्यंत या महाराष्ट्राला एखाद दुसरा अपवाद वगळता महाराजांचे अस्सल वारसदार म्हणविणार्‍या  राज्यकर्त्यांनी उघडपणे लुटले. (खरेतर अपवाद वाटणारेही  महाराष्ट्राचे सुपूत्र म्हणून महाराजांचेच वारस) महाराजांचे वारस म्हणविणार्‍या या मंडळींनी तत्कालीन राजकीय विरोधकांना जातीयवादी म्हणून हिणवले. जनतेनेही आज  ना उद्या सुधारतील, म्हणून सोसले. तथापी सुधारणा होताना दिसण्याऐवजी परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सोसणं असह्य होत आहे याची जाणीव झाल्यानंतर या  मंडळींचे राजकीय विसर्जन करण्याचा मार्ग चोखाळला.
जनतेच्या या निर्णयाचा फायदा अलगद कालपरवा पर्यंत शेठजी भटजींचा पक्ष म्हणून हेटाळणी सोसलेल्या भाजपाला झाला. परंपरागत सत्ताधार्‍यांविषयी जनमानसात  निर्माण झालेली नकारात्मक भावना भाजपाच्या पथ्यावर पडली. आणि कालपरवा पर्यंत शेठजी भटजींचा म्हणून हेटाळणी वाट्याला आलेला पक्ष जनाधार असलेला  सर्वात बलाढ्य पक्ष म्हणून राजकीय क्षितिजावर अवतरला. अर्थात या प्रवासात अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी भाजपाच्या जेष्ठ श्रेष्ठ मंडळींनी घेतलेली मेहनत,  केलेले नियोजन नाकारता येणार नाही. विरोधी पक्ष म्हणून काम करीत असतांना त्यांनी केलेला जनतेच्या नाडीचा अभ्यास या यशात महत्वाचे स्थान प्राप्त करतो.
महाराष्ट्राची जनता भावूक आहे. महापुरूषांवर नितांत श्रध्दा ठेवून जपणारी आहे. हे जाणून महापुरूषांचा शिडीसारखा वापर या प्रवासात महत्वाचा ठरला. शेठजी  भटजींचा पक्ष ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी शिडी आवश्यक होती. ती मिळाली .
प्रश्‍न प्रतिमा बदलण्याचा नाही. पण रयतेला महापुरूषांच्या नावावर जवळ केल्यानंतर त्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचा, दिलेले वचन पाळण्याचा आहे. अर्थात विद्यमान  सरकार आणि मागील पंधरा वर्षाच्या सरकारचा कारभार यांची तुलना करणे एका अर्थाने संयुक्तिक नसले तरी गेल्या अडीच वर्षाच्या कारभारातून जे काही पाझरत  आहे त्यावरून अंदाज बांधणे अगदीच अशक्य नाही. जेंव्हा जेंव्हा जनमत राज्यकारभाराविरूध्द रोष व्यक्त करू लागते तेव्हा तेंव्हा महापुरूषांचा आधार घेण्याची  सत्ताधार्‍यांची खोड जुनीच आहे. आजवरच्या सत्ताधार्‍यांची ही खोड विशेषत्वाने नजरेत येऊ दिली गेली नाही कारण ते स्वतःला या मातीतील भुमीपुत्र म्हणवून घेत  होते. त्यांनी मातृद्रोह केला हा भाग वेगळा. पण विद्यमान राज्यकर्त्यांना आपण या मातीशी इमान राखीत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, राजश्री शाहू  महाराज, डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांशी बांधिलकी आहे. याविषयी वारंवार सांगण्याची वेळ येते आहे. ही वेळ का येते? तर जनतेला त्यांच्या कारभारात कुठेच  ओलावा दिसत नाही. रोजगार, शिक्षण, निवारा, कायदा सुव्यवस्था, अशा कुठल्याच पातळीवर जनता आज समाधानी नाही. महापुरूषांच्या नावावर वेगवेगळ्या योजना  जाहीर करूनही त्याचा पाझर जनतेची तहान भागवू शकत नाही. मग छत्रपतींच्या राज्यात रयत उपाशी, कर्जबाजारी, फुटपाथवर झोपत असेल, म. फुलेंचे शेतकरी  लेकरं कर्जापोटी आत्महत्या करीत असतील, डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था विकली जात असेल तर...?