Breaking News

निरामय आरोग्यासाठी योगा करणे गरजेचे -पंतप्रधान नरेंद्र मोदी

लखनौ, दि. 21 - तिसर्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौमधील रमाबाई मैदानातील योग कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘योगा  केल्यामुळे आरोग्य चांगले राहते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने योगा करायला हवा,’ असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जनतेला सांगितले. यावेळी राज्यमंत्री राम नाईक,  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेदेखील उपस्थित होते.
आपल्या रोजच्या जेवणात ज्या प्रमाणे मीठाचे स्थान आहे त्याप्रमाणे योगादेखील आयुष्यात महत्वाचा आहे. मनस्थिर ठेवण्यासाठी योगसाधना आपल्याला मदत करते.  ‘तंदुरुस्तीसोबतच निरोगी राहणेदेखील गरजेचे आहे. योग केल्याने शरीर निरोगी राहते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात योगाला स्थान द्यायला हवे. तसेच  आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
योगाभ्यास आज प्रत्येक व्यक्तीचा, घरामधला एक अविभाज्य भाग झाला आहे. जगातील अनेक देशांना भारतीय संस्कृतीबद्दल माहिती नसली तरी देखील ते योगाच्या  माध्यातून जोडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला मान्यता दिल्यानंतर लोकांची योगा करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. ‘गेल्या तीन वर्षांमध्ये योगाची  संस्थाने सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे योग शिक्षकांना मोठी मागणी असून योग शिक्षकांची संख्या वाढली आहे. अनेकांनी योग शिक्षण हा व्यवसाय म्हणून  निवडला आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह 51 हजार नागरिकांनी आज योगा केला.