Breaking News

सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिले वृक्षारोपणाचे निमंत्रण

नवी दिल्ली, दि. 29 - वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन 1 जुलै पासून राज्यात सुरु होत असलेल्या 4  कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तसेच, राज्यातील महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. ठाणे जिल्ह्यातील ऐरोली येथे 1 जुलै रोजी राज्यपाल सी. विद्यासागर  राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा  राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी व राज्याच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी श्री. मुनगंटीवार  यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी, ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय  संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची भेट घेतली. 
शास्त्री भवन येथे आज श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. श्री. मुनगंटीवार यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण  दिले. यावेळी त्यांनी राज्यातील शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत निधींची मागणी केली. केंद्राकडून या कार्यक्रमासाठी वर्षाअखेर निधी प्राप्त होत असल्याने  अमंलबजावणीत विविध अडचणी येतात. तेव्हा केंद्राने या कार्यक्रमासाठी अग्रीम स्वरूपात निधी उपलब्ध करून दिल्यास राज्याला नियोजन करणे सोयीचे होईल, असे  श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. श्री. जावडेकर यांनी राज्याच्या या मागणीचा सकारात्मकपणे विचार करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले.
कांदा निर्यातीस 3 महिन्यांची मुदतवाढ मिळावी श्री. मुनगंटीवार यांनी नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय वित्त व नियोजनमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय  संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेही उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात 25 टक्यांनी वाढलेले कांदा उत्पादन आणि अन्य राज्यातही विक्रमी कांदा  उत्पादन झाल्यामुळे दर कमी झाले आहेत. कांदा उत्पादक शेतक-यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातीला तीन महिन्यांपर्यंत मुदत वाढ  द्यावी, अशी मागणी श्री. मुनगंटीवार यांनी श्री. जेटली यांना केली. या मागणीबद्दल श्री. जेटली यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी  सांगितले.
राज्य शासनाने शेतक-यांचे कर्जमाफ करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनाङ्क सुरू केली आहे. राज्य शासनाने याकरिता आर्थिक तरतूदीचे  नियोजन केलेले आहे. राज्यशासन महागडे व्याजदर असणारे कर्ज फेडत आहे. असे कर्ज फेडतांना राज्यशासनाला अग्रीम रक्कम भरावी लागते, हा अग्रीम निधी न  भरण्याची राज्य शासनाला सवलत मिळावी, त्यामुळे राज्यशासनाला दरवर्षी 3 ते 4 हजार कोटी रूपयांची बचत करता येईल. खुल्या बाजारातून कर्ज उपलब्धतेची  मर्यादा 15 हजार कोटीपर्यंत करण्यात यावी, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्त मंत्री यांच्याकडे केली.
मराठवाड्यात इको बटालीयनचा प्रस्ताव राज्य शासनाने मांडला होता, याबाबतचा निर्णय अंतीम टप्प्यात असून इको बटालीयनच्या माध्यमातून संरक्षण  मंत्र्यालयाच्यावतीने वृक्षारोपण करता येईल. मराठवाड्यातील बहुतेक जिल्हे हे दुष्काळ ग्रस्त आहेत. येथे वन क्षेत्र अंत्यत कमी आहे इको बटालीयनमुळे वन क्षेत्रात वाढ  होईल. याबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे स्वत: पाठपुरावा करतील, असेही श्री मुनगंटीवार यांनी सांगितले. देशात उत्तराखंड,आसाम आणि दिल्ली  येथे अशा प्रकारच्या बटालीयन आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्तावीत सैनिक शाळेविषयीही यावेळी केंद्रीय वित्तमंत्री यांच्याशी चर्चा झाली. लवकरच चंद्रपूर येथे 26 वी  सैनिकी शाळा उभारण्यात येणार आहे. याविषयी काही तांत्रिक समस्या आहेत. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली असून लवकरच सौनिकी शाळा  उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती श्री मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्रात सातारा येथे 1961 मधे देशातील पहिली सैनिकी शाळा स्थापन करण्यात  आली.
पुढच्या वर्षी खणन मंत्रालयाच्यावतीने राज्यात 25 लाख वृक्षारोपण करण्यात येणार, असल्याची माहिती वने मंत्री श्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय ऊर्जा व खणन मंत्री  पियुष गोयल यांच्याशी श्रम शक्ती भवन येथे झालेल्या बैठकीनंतर दिली. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील खणन विषयक बांबीवर चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या  प्रमाणात कोळसा खाणी आहेत. जिल्ह्यातील जनतेचे उदर्निवाहाचे साधन हे कोळसा खाणींवर अवलंबून आहे. या खाणींचा तसेच जिल्ह्यातील बहूतेक भाग हा वेर्स्टन  कोल्डफिल्डच्या मालकीचा आहे. त्यामुळे या परिसरातील सौदर्यंकरणातंर्गत पुढील वर्षी 25 लाख वृक्षारोपण हे केंद्रीय खणन मंत्रालयाच्यावतीने होणार आहे. यासह  जिल्ह्यातील स्वच्छता, प्रदूषण मुक्त करण्याची जबाबदारी वेस्टर्न कोल्डफिल्ड ने पार पाडावी, अशी विनंती वित्तमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री श्री  मुनगंटीवार यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानीक बहुतेक जनतेचा व्यवसाय हा कोळश्याशी संबधीत आहे. या व्यवसायिकांना नियमीत कोळसा उपलब्ध व्हावा,  अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासह जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी असल्यामुळे खणन पर्यटन अशी अभिनव संकल्पना येथे सुरू करावी, अशी मागणी केली.  यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळाले. या मागण्यांवर केंद्रीय मंत्री श्री गोयल यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे श्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
वित्त तसेच वने मंत्री श्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची शास्त्री भवन येथे भेट घेऊन त्यांना 1 जूलै रोजी होणा-या वृक्षारोपण  अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तसेच राज्यातील विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. राज्यातील माहिला बाल कल्याण विषयी तसेच पर्यावरण विषयी  सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीमती गांधी या जुलैच्या दुस-या आठवड्यात राज्यात येणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.