Breaking News

ल्यूपिन कंपनीचे संस्थापक देशबंधू गुप्ता यांचे निधन

मुंबई, दि. 27 - ल्यूपिन या औषध निर्मिती कंपनीचे संस्थापक व संचालक मंडळाचे अध्यक्ष देशबंधू गुप्ता (वय 79) यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले.  गुप्ता यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. राजगढ (राजस्थान) येथे 1938 जन्मलेले गुप्ता राष्ट्रवादी विचारांचे होते. सर्वांचा विकास झाला पाहिजे यावर त्यांचा विश्‍वास होता. 1968 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आज ती जागतिक स्तरावरील कंपनी बनली आहे. सध्या कंपनीचे काम 100 पेक्षा अधिक देशांत सुरू आहे. गरिबी दूर करणे व आरोग्य विकासाचे कार्यात सहभाग म्हणून 1988 मध्ये ल्यूपिन ह्यूमन वेलफेअर एण्ड रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली.
वडिलांच्या निधनाने आम्ही सर्व जण मोठ्या दु:खात आहोत, असे ल्यूपिनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनिता गुप्ता व व्यवस्थापकीय संचालक नीलेश गुप्ता यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. कंपनीची शेअर बाजारातील भांडवल सुमारे 48 हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे कंपनी देशातील दुसरी मोठी औषधी निर्मिती करणारी कंपनी बनली आहे. गुप्ता यांच्या प्रयत्नाने देशातील 3 हजार 463 गावांतील 28 लाख कुटुंबांना फायदा झाला.