Breaking News

अमेरिकेत जीएसटी अभ्यासक्रमाचा विषय होऊ शकतो - पंतप्रधान मोदी

वॉशिंग्टन, दि. 27 - भारतात 1 जुलैपासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी केली जात आहे. अमेरिकेतील व्यवसाय संबंधी महाविद्यालयात हा अभ्यासक्रमाचा विषय होऊ शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौ-यावर असून तेथील उद्योगपतींसोबतच्या बैठकीत ते बोलत होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.
संपूर्ण जग आज भारताकडे पहात आहे. व्यवसायात सहजता येण्यासाठी मोदी सरकारने गेल्या दोन-तीन वर्षांत सुमारे सात हजार दुरुस्त्या केल्या आहेत. परदेशी गुंतवणूकदारही भारतात एकसमान वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होण्याची वाट पहात आहेत. ही कर प्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारांकडून लावला जाणारा अतिरिक्त कर रद्द होणार आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारताची होत असलेली प्रगती ही भारत व अमेरिका या दोन देशांसाठी फायदेशीर असल्याचे दर्शवते. अमेरिकेतील कंपन्यांकडे भारतात गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य संधी आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.