‘डीआरएस’च्या नियमावलीतील बदलास ‘आयसीसी’चा हिरवा कंदील
लंडन, दि. 27 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीने निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस)च्या नियमावलीत सुचवलेल्या बदलांना परिषदेच्या मुख्य कार्यकारी समितीने संमती दर्शवली आहे. आतापर्यंत पंचांच्या निर्णयानंतर ‘रिव्ह्यू’ घेतल्यास पंचांचा निर्णय चुकीचा, बरोबर किंवा तटस्थ असे तीन पर्याय या प्रणालीत उपलब्ध होते. त्या पैकी तटस्थ या पर्यायात पंचांनी दिलेला जो निर्णय असेल, तो निर्णय तिसरे पंचही कायम ठेवत असत. अशा वेळी घेतलला ‘रिव्ह्यू’ वाया जात होता. मात्र आता पायचीत झाल्यानंतर कोणीही ‘रिव्ह्यू’ घेतला व त्यावर तिस-या पंचांनी ‘तटस्थ’ हा पर्याय दिला, तर तो घेतलेला ‘रिव्ह्यू’ मोजला जाणार नसल्याचा निर्णय परिषदेने दिला आहे.1 ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू होणार आहे. तसेच, टी20 क्रिकेटमध्येही ‘डीआरएस’ प्रणाली वापरण्यात येणार असून कसोटी क्रिकेटमध्ये 80 षटकांनंतर वाढणारी ‘रिव्ह्यू’ची संख्या आता वाढवण्यात येणार नसल्याचेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.