Breaking News

गतिमंद मुलांसाठी नवक्षितिज संस्थेच्या वतीने ट्रेकिंगचे आयोजन

पुणे, दि. 22 - गतिमंद मुलांचा आत्मविश्‍वास वाढविण्याच्या दृष्टीने फारसा प्रयत्न होताना दिसून येत नाही. त्यामुळे हा आत्मविश्‍वास मुलांमध्ये वाढावा तसेच  निसर्गसौंदर्यचा आनंद घेत त्यांना ट्रेकिंग सारख्या या साहसी खेळात सहभाग घेता यावा, या हेतूने नवक्षितिज संस्थेच्या वतीने गतिमंद मुलांसाठी आठव्यांदा हिमालय  ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ट्रेकिंगसाठी हा चमू कुलू येथे जाणार आहे.
जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात, गणपती बाप्पा मोरया म्हणत या चमूचा उत्साह सर्वांना प्रेरित करणारा होता. आत्तापर्यंत या संस्थेने भारतातील विविध  भागात या विशेष मुलांसाठी 12 कॅम्प आयोजित केले आहेत.
या ट्रेकिंगच्या कॅम्पमध्ये नवक्षितिज संस्थेतील 30 व इतर संस्थेतील 4 गतिमंद मुलांचा सहभाग आहे. त्यांच्याबरोबर 15 स्वयंसेवकही सहभागी झाले आहेत. सोमवार  दि. 19 जून 2017 रोजी पुणे स्टेशनवरून सायंकाळी झेलम एक्स्प्रेसने ही चमू रवाना झाली. या चमूला शुभेच्छा देण्यासाठी पुण्याचे माजी उपमहापौर डॉ.सतीश  देसाई, झेप संस्थेचे मोहन भागवत, राजेश पाटणकर व समाजातील इतर हितचिंतक उपस्थित होते.