Breaking News

मातृतिर्थ जिजाऊंच्या जिल्ह्यातच चर्मकार महिलेची जातीयवादी गावगुंडांनी काढली विवस्त्र धिंड!

बुलडाणा, दि. 06 - तालुक्यातील धाड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेले रुईखेड मायंबा येथे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली असून येथील राधाबाई उंबरकर व रविंद्र उंबरकर 2 जून रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास शेतातून घरी येत असताना गावातील मराठा समाजाचे गावगुंड सखाराम रामराव उगले, विजय तेजराव उगले यांनी राधाबाई उंबरकर व रविंद्र उंबरकर यांच्यावर बैल चोरुन नेत असल्याचा खोटा आरोप करुन छेडछाड करण्यास सुरुवात केली. व वाईट उद्देशाने महिलेचे कपडे काढण्यास सुरुवात केली. परंतु महिलेने प्रतिकार केला असता सखाराम उगले व विजय उगले यांनी गावातील लोकांना बोलावून घेतले. जवळपास 30 ते 40 जणांच्या जमावाने  राधाबाई यांना विवस्त्र करुन बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. तिचे सर्व कपडे काढून गावातून नग्नावस्थेत धिंड काढली. ही घटना मातृतिर्थ जिजाऊ जिल्ह्यात घडल्याने बुलडाणा जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली आहे. तर या गाव गुंडांविरुद्ध धाड पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी घटनास्थळाला भेट देवून जखमी कुटुंबाला धाड येथील सरकारी दवाखान्यात भरती केले. प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे रेफर करण्यात आले. याप्रकरणी राधाबाई उंबरकर यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध अपराध क्र.143/17 कलम 354,354(ब),324, 323, 143, 147,148, 294, 506 भादंवि सह कलम 2,3, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केले असून त्यापैकी 21 जण सखाराम रामराव उगले, विनोद सखाराम उगले, बाबुराव देवबा सोनुने, विजय तेजराव उगले, डिगांबर उगले, कौतिकराव नामदेव वाघ, युवराज भिमराव सोनुने, कृष्णा काशिनाथ तायडे, संदीप साहेबराव उगले, राजू घुले, नारायण नबाजी उगले, विजय काशीनाथ तायडे, गंगाराम भाउराव तायडे, अनंता नारायण गजघाने, गंजीधर माणिकराव सोनुने, अण्णा संपत उगले, अरुण रामराव उगले, सतीश लक्ष्मण उगले, प्रदीप सुखराम उगले, अरुण सुरेश फेपाळे, शेनफड भगवान उगले यांना अटक करण्यात आली असून सदर घटनेचे सूत्रधार मात्र अद्यापही फरार आहेत. पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी महामुनीसाहेब व ठाणेदार संग्राम पाटील हे पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. अशीच एक घटना लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथे दि.30 मे रोजी शेतातील कामे करण्यासाठी रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेवून जात असताना गावातील मराठा समाजाचे राजेश्‍वर मुरलीधर दहातोंडे, मुरलीधर निवृत्ती दहातोंडे, भगवान दहातोंडे यांच्यासह 15 ते 20 लोकांनी शेत रस्त्यावरुन वाद निर्माण करुन चर्मकार समाजातील महादेव शिवाजी त्र्यंबके, मधुकर लक्ष्मण त्र्यंबके, शिवाजी लक्ष्मण त्र्यंबके, संदीप शिवाजी त्र्यंबके यांना बेदम मारहाण केली आहे. सदर दोन्ही घटना केवळ जातीय द्वेषातून झाल्या असून मराठा जातीतील लोकांनी चर्मकार महिलेला विवस्त्र करुन मारहाण केली आहे. सदर घटना निंदनीय असून महिलांच्या अस्मितेला धक्का देणारी आहे म्हणून जिल्ह्यातील चर्मकार समाज एकत्र येवून सदर घटनेचा निषेध करत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सदर निवेदनावर काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे, इंजि.शिवाजी जोहरे, पुरुषोत्तम बोर्डे, समाधान चिंचोले, शालिकराम इंगळे, सुरेश कावळे, गजानन चिम, ज्ञानदेव वानेरे, भगवान तांदळे, उत्तमराव सोनुने, वासुदेव शेगोकार, हरिभाउ पदमने, शालिकराम गवई, कोंडुजी मानवतकर, मधुकर त्र्यंबके, संजय सुरडकर, बाळासाहेब वानेरे, रामदास माठे, पी.पी.काकडे, विठ्ठल शेळके, हरिभाउ शेळके, सारंगधर उंबरकर, आनंदा उंबरकर आदींच्या सह्या आहेत. तर घटनेतील जखमींना आ.राहुल बोंद्रे, आ.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.संतोष आंबेकर, जि.प.सदस्य जयश्रीताई शेळके आदींनी भेट दिली.