पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी इतिहास घडविला - उध्दव ठाकरे
अहमदनगर,दि.26 : पुणतांबा येथील विविध मागण्यांसाठी शेतकरी संपाची हाक दिली. देशात प्रथमच अशा प्रकारे अन्नदाता असलेला शेतकरी संपावर गेला. संपाचे उत्कृष्ट नियोजन करणा-या पुणतांबा येथील शेतक-यांनी राज्यातील सर्वच शेतक-यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळेच या शेतक-यांना मानाचा मुजरा करण्यासाठी आपण पुणतांबा येथे आलो आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने रविवारी सायंकाळी पुणतांबा येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद सभेत ठाकरे बोलत होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे,उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासहीत शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उध्दव ठाकरे म्हणाले, शेतकरी जणू काही मुकं जनावर आहे, अशा मस्तीत आतापर्यंतची सरकारे वागत होती. मात्र राज्यातील सध्याच्या सरकारने शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. ही खरोखरच एक ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे आपण राज्य सरकारला धन्यवाद देतो. राज्यात नुकत्याच झालेल्या शेतक-यांच्या संपाने शेतक-याच्या मस्तकात आग गेली तर काय होऊ शकते हे दाखवून दिले आहे. भारतात शेतकरी व संप हे दोन शब्द कधीही एकत्र आले नव्हते. त्यामुळे न्याय्य मागण्यांसाठी पुणतांबा येथील शेतक-यांनी संपासाठी पुढाकार घेतल्यानंतर काही शेतकरी आपणास भेटावयास आले होते. त्याच वेळी आपण त्यांना शिवसेना खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास दिला होता. रात्रंदिवस कष्ट उपसून ही पिढ्यान पिढ्या कर्जाच्या विळख्यात गुंतलेला शेतकरी कधी कर्जमुक्त झालाच नाही. राज्यात सत्ताबदल केल्यानंतर शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहातो आहे. मात्र कर्जाच्या विळख्यातील शेतक-यांच्या आत्महत्या कशा थांबवायच्या हा मोठा प्रश्न होता. 8 लाख कोटींपासून ते 20 लाख कोटींपर्यंतची कर्ज बुडवून मोठे उद्योगपती पळाले. मात्र किरकोळ कर्जाच्या वसुलीसाठी बँकांचे अधिकारी शेतक-यांच्या घरात घुसून मारझोड करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. असे सरकार आपणास अपेक्षित नाही. त्यामुळेच शेतकरी संपावर गेल्यानंतर त्यांना संरक्षण देण्यासाठी आपण शिवसैनिकांना देखील रस्त्यावर उतरण्याचा आदेश दिला होता, असे ठाकरे यांनी सांगितले.