हरिपूर गावातील दोन गटात जोरदार हाणामारी, पाच जखमी
सांगली,दि.26 : मिरज तालुक्यातील हरिपूर या गावात बोंद्रे व फाकडे या दोन पारंपरिक राजकीय गटात रविवारी सकाळी जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले असून तीन चारचाकी वाहनांची मोठ्याप्रमाणात मोडतोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे हरिपूर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले असून सुमारे 200 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण गावभर तैनात करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस उपअधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली काळे- कांबळे यांनी पोलिस फौजफाट्यासह गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. याप्रकरणी या दोन्हीही गटांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
या हाणामारीत फाकडे गटाचे सागर गजानन फाकडे, सचिन गजानन फाकडे, प्रकाश गोविंद फाकडे, रघुनाथ गोविंद फाकडे व अन्य दोघेजण असे सहाजण जखमी झाले आहेत. या सर्वांवर येथील वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मिरज तालुक्याच्या राजकारणात अंतिसंवेदनशील असणा-या हरिपूर या गावातील बोंद्रे व फाकडे या दोन राजकीय गटात पुन्हा राडा झाल्याने संपूर्ण दिवसभर या गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आजच्या या हाणामारीला वाळू व्यवसायातील स्पर्धाच कारणीभूत असल्याची चर्चा हरिपूर गावात सुरू होती. या हाणामारीत या दोन्ही गटाकडून गज, काठी, दगड व काचेच्या बाटल्या यांचा सर्रास वापर करण्यात आला.
रविवारी सकाळी किरकोळ कारणातूनच या दोन गटात पुन्हा वादाला तोंड फुटले. गेल्या तीन ते चार दिवसापासून या दोन गटात हा वाद सुरू होता. हरिपूर गावासह सांगली- हरिपूर रस्त्यावरील गणेश मंदिर अशा दोन ठिकाणी या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यावेळी या दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार ते पाच चारचाकी वाहनांची मोठ्याप्रमाणात मोडतोड करण्यात आली. या हाणामारीत फाकडे गटाचे पाच ते सहाजण जखमी झाले. अचानक या दोन गटात वाद उफाळून आल्याने संपूर्ण गावातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते.