Breaking News

आश्‍वी खुर्दमध्ये सलग दोन दिवस चोरट्यांचा धुमाकूळ दुकांनाची तोडफोड, शस्त्राचा धाक दाखवून लुट

संगमनेर, दि. 22 - तालुक्यातील आश्‍वी खुर्द शिवारात चोरट्यांनी सलग दोन दिवस धुमाकुळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गावातील काही  दुकानांची तोडफोड केली तर गाव परिसरात महिलांना शस्त्राचा धाक दाखवून मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
मंगळवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास प्रवरा उजव्या कालव्यालगत डॉ. विरेश भोसले यांच्या हॉस्पिटलच्या गाळ्यामधील महेंद्र खरात यांच्या पंक्चर दुकानाचे शेटर  चोरट्यांनी वाकवून दुकानातील टामी, हातोडा घेतला व शेजारील मंगेश गाडे यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडले. 600 रुपयांची चिल्लर व बिस्कीटे काढून घेतली.  त्यानंतर  अमोल गागरे यांच्या मेडीकलकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला.  टामीने मेडीकलचे शटर वाकवून आत प्रवेश केला. गल्लयातील 900 रुपयांची चिल्लर काढून  मेडीकलमधील काचांची तोडफोड केली. मेडीकल बाहेरच चोरट्यांनी बिस्कीटांवर ताव मारत समोर असलेल्या दत्त कृपा कषी सेवा केंद्राच्या शटरचा मधला सेंटर लॉक  तोडत आत प्रवेश केला. गल्ल्यातील 5000 रुपये काढून घेतले. बाहेर येतांना सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे संगणक बंद करत त्यातील फुटेज डिलीट केले. हे चोरटे शिक्षीत  असल्याचे या घटनेवरुन समजते. सकाळी दुध डेअरीला घालणार्‍या शेतकर्‍यांच्या नजरेत हा प्रकार आला. आश्‍वीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व त्यांच्या  सहकार्यांनी घटनास्थळी भेट देवून चोरांना लवकरच पकडण्यात येईल असे आश्‍वासन दिले.
दुसर्‍या दिवशी काल बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी गावाच्या दक्षिणेस असलेल्या मांढरे वस्तीवरील सुभाष मांढरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मांढरे  व त्यांच्या पत्नीला धारधार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने घेवून तेथून पळ काढला. त्यानंतर सुरेश शिवाजी गायकवाड यांच्या  वस्तीशेजारी चोरटे दबा धरुन बसले होते. कुत्रे व गायी ओरडायला लागल्याने सुरेश गायकवाड यांना जाग आली. ते इतरांना सावध करत असल्याचे चोरट्यांच्या  लक्षात येताच चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला. रात्री 1 वाजेच्या सुमारास गायकवाड वस्ती चारी क्रमांक 7 जवळील ग्रामपंचायत सदस्य व नोकरी निमीत्त लोणी  येथे रहात असलेले दादा गायकवाड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक केली. तेथे काहीही हाती न आल्याने त्यांनी आपला मोर्चा  शेजारील किरण गायकवाड यांच्या घराकडे वळविला. घरातील लहान मुलींच्या गळ्याला धारधार शस्त्र लावत गायकवाड कुटूंबाकडील 15 हजार रुपये किंमतीचा  मोबाईल व पाच हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेत घराशेजारील ऊसातून पलायन केले. किरण गायकवाड यांंंनी शेजार्‍यांना उठवून घडलेला प्रकार सांगितला.  रात्री 1.30 वाजेच्या सुमारास आश्‍वीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पोलीस  घटनास्थळी दाखल झाले. मात्र  चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांच्या धुमाकूळामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान चोरट्यांची संख्या पाच ते सहा असून ते दारुच्या नशेत असतात. पायात चप्पल न घालणारे व मराठी भाषा बोलणारे आहेत. नियोजनबध्द चोरी करणार्‍या या  चोरटयांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. या घटनेचा गुन्हा आश्‍वी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात  खळबळ उडाली आहे.