Breaking News

संग्रामपूर आरोग्य केंद्रात डॉक्टरविना रुग्णांवर उपचार!

वैद्यकीय अधिकार्‍याच्या सल्ल्याशिवाय सलाइन दिल्याने अनेक रुग्ण गंभीर

बुलडाणा, दि. 02 - येथील प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविनाच चालत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सदर आरोग्य केंद्रात डॉक्टर नसताना रुग्णांवर चुकीचे उपचार झाल्याने अनेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. 22 मे रोजी ताप आल्याने काही रुग्ण उपचारासाठी आरोग्य केंद्रात आले असता येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने परिचारिकेने प्राथमिक उपचार म्हणून नेहमीप्रमाणे रुग्णांना वैद्यकीय सल्ल्याशिवाय सलाईन टोचले. जवळपास आठ ते दहा रुग्णांना काही वेळानंतर सलाईन टोचल्याने   थंडी वाजायला लागती तर काहींना खूप घाम येवू लागला. यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी परिचारिकेला वैद्यकीय अधिकार्‍यांना बोलावण्याची विनंती केली. मात्र वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होवू शकले नाही. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत परिचारिका व औषध निर्माण अधिकारी यांच्या भरवशावर दवाखाना असतो की काय असा प्रश्‍न नातेवाईकांना पडला. येथे डॉ.दिपाली जाजू ह्या दि.23 मे रोजी रुजू झाल्या आणि घटना ही 22 मे रोजीची असून त्या दिवशी डॉ.ए.व्ही.उजवणे ह्या सुटीवर असल्याने रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागली. या रुग्णांमध्ये गुड्डी पवार, दिव्या पवार, गजानन बोदडे, यमुना सोनुने, छकुली पवार हे गंभीर असून त्यांच्यावर खामगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. तर सदर आरोग्य केंद्र हे परिचारिका आर.एस.धाकडे व औषध निर्माण अधिकारी बोंद्रे यांच्याच भरवशावर असल्याने त्यांना कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय रुग्णांवर उपचार करावे लागतात. म्हणून आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.