Breaking News

शेतकरी संपाला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलडाणा, दि. 02 - शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करणे यांसह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आज 1 जूनपासून राज्यभरातील शेतकर्‍यांनी संप पुकारला आहे. या संपाला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध पक्ष, संघटनांच्या वतीने या संपाला पाठिंबा दिला आहे. 
बुलडाणा येथे सकाळी स्टेट बँक चौकात शिवसेनेच्या वतीने सकाळी 8 वाजता हजारो लिटर दूध ओतून संपात सहभाग नोंदविला. स्वत:च पिकवणार आणि स्वत:च खाणार असा निर्धार करत आजपासून संपूर्ण राज्यातील शेतकरी संपावर गेला असल्याने ग्रामीण भागातून बुलडाणा शहरात येणारा भाजीपाला, दूध पुरवठा थांबविण्यात आला. तर शिवसेना प्रणित किसान सेनेचे उप जिल्हाप्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वात स्टेट बँक चौकात ग्रामीण भागातून आलेल्या शेतकर्‍यांजवळचे सर्व दूध ओतून संपाला समर्थन देण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध करण्यात येवून स्वामीनाथ आयोगाच शिफारशी लागू करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी लखन गाडेकर, अजिंक्य पाटील, ज्ञानेश्‍वर राजपूत, विशाल माळी, विकास उगले, किरण पाटील, विजय सोनुने, निलेश बारोटे, सतीश जगताप, गजानन उबरहंडे, निलेश काकडे, गजानन जाधव, अनिल उबरहंडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी हजर होते.  
जिल्हा कॉगे्रस कमिटीचा पाठींबा
चिखली : राज्यासह जिल्हयातील शेतकरी चौफेर संकटाने घेरला असतांना त्याला तातडीची आवश्यक मदत देण्याऐवजी पोकळ योजनांचा मारा तथाकथीत सवांद यात्रेच्या माध्यमातून शेतकर्‍यांवर केला जातो आहे.  शेतकर्‍यांना अच्छे दिन चे डमरू वाजवून शेतकर्‍यांना भुलविण्याचा धंदा सत्ताधार्‍यांकडून केला जातो आहे. मात्र भ्रमनिरास झाल्याने राज्यातील व जिल्हयातील शेतकर्‍यांनी कधी नव्हे ते संपाचे हत्यार उपसले आहे. त्याला बुलडाणा जिल्हा कॉगे्रस कमिटीने जाहीर पाठींबा व्यक्त करून शेतकर्‍यांच्या या आंदोलनात जिल्हाभरातील कॉगे्रस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपुर्ण आंदोलनाला सहकार्य करीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले आहे.
पुणतांब्यातील राज्यव्यापी शेतकरी बैठकीत संपाचा अंतिम निर्णय घेवून शेतकर्‍यांचा संप 1 जुन पासून सुरू झालेला आहे. शेतमालाला योग्य हमी भाव दयावा, शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करा, शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव दयावा, स्वामीनथन आयोगाच्या शिफारसी लागु करा, शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागु करावी, तसेच शेतकर्‍यांची कर्ज माफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. 1 जून पासून शेतकर्‍यांनी उत्पादन केलेला कोणताही शेती माल विकणार नाही तसेच शहराकडे जाणारे दुध आणी भाजीपालाही शेतकर्‍यांकडून रोखल्या जाणार आहे.  महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेेतकर्‍यांच्या या आंदोलनामध्ये बुलडाणा जिल्हा कॉगे्रस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपुर्ण आंदोलनाला सहकार्य करीत या संपात सहभागी व्हावे, अशी विनंती जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केली आहे.
आडते व व्यापार्‍यांचा संपास पाठिंबा
लोणार- लोणार येथील बाजार समितीतील आडते,व्यापारी यांनी आजपासून सुरु झालेल्या शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा दिला असून बंदचे निवेदन सभापती शिवपाटील तेजनकर यांच्यासह संचालक मंडळाकडे दिले आहे. शेतकर्‍यांनी जो राज्यव्यापी संप पुकारला आहे, त्या संपात आम्ही सहभागी असून शेतकर्‍यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आडते व व्यापारी आपला माल घेणार नाहीत. तसेच बेमुदत संप पुकारत आहोत, आम्ही शेतकर्‍यांचे हितचिंतक असून त्यांना योग्य तो न्याय मिळावा, अशा आशयाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेजनकर यांच्यासह प्रा. बळीराम मापारी, संतोषराव मापारी, दहातोंडे, तेजराव घायाळ यांना देण्यात आले. निवेदनावर राजेश बोरा, एकनाथ सानप, जगन कुलाळ, कैलास जायभाये, संदिप संचेती, संतोष सुराणा आदींच्या सह्या आहेत.    
मेहकरमध्येही आडत्यांचा पाठिंबा
मेहकर- राज्यातील शेतकर्‍यांनी 1 जूनपासून पुकारलेल्या संपास स्थानिक बाजार समितीतील धान्य खरेदीदार, आडते यांनी जाहीर पाठिंबा देत 2 जूनपासून बाजार समितीमध्ये धान्य खरेदी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव व उपसभापती बबनराव तुपे, सचिव एस.बी.बंगाळे यांना आज दिलेल्या निवेदनात धान्य खरेदीदार व आडते यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर गेले असून त्यांना पाठिंबा म्हणून 2 जून पासून धान्य खरेदीदार व आडते धान्य मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहेत. यावेळी प्रमोद अग्रवाल, मनोज अग्रवाल, नारायण काबरा, दत्तात्रय तांगडे, गजानन भोकरे, रवी जाधव, श्रीकृष्ण लहाने, मोहन सावजी, प्रमोद खरात, तेजराव जाधव, संजय रहाटे, अशोक म्हस्के, राहूल तुपे, शंकरसेठ अग्रवाल, विजय अग्रवाल, सतीश अग्रवाल हजर होते. बाजार समितच्या वतीने संचालक सुरेश काळे, बबनराव भोसले, रामेश्‍वर बोरे, दत्ता पाटील, माधवराव अरसोंडे, राजू चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.