शहरातील नागरी समस्यांवरून काँगे्रस आक्रमक
मुख्याधिकारी यांना दिले निवेदन; तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन
बुलडाणा, दि. 17 - पावसाळा सुरू होवूनही चिखली शहरातील नाल्यांची सफाई नाही, रात्रीच्या वेळेस गावातील पथदिवे बंद असतात, रस्त्या लगत असलेल्या नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर येवून सर्वत्र घाण पसरत आहे, रस्त्यावर असलेल्या मोठया खड्डयांची दुरूस्ती नसल्याने त्यात पाणी साचून नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळयातील रोगराईचे व साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता बळावली असून 20-20 दिवस नळाव्दारे पाणी पुरवठा होत नाही. या सर्व समस्या सोडविण्यासाठी आक्रमक होत चिखली शहर कॉगे्रसटीचे पदाधिकारी व नगरसेवकांनी नगर परिषद मुख्याधिकारी इंगोले यांना धारेवर धरले व वरील समस्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने जाब विचारला. त्यावर नगर पालिकेतील सर्व विभाग प्रमुख व मुख्य लिपीक यांना तात्काळ कारवाई सुरू करून यात हयगय करणार्या कर्मचार्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे खडे बोल मुख्याधिकारी यांनी पदाधिकार्यांसमोरच सुनावले.यावर्षी लवकर सुरू झालेेला पावसाळा व त्यातच मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू असतांना चिखली शहरातील समस्यांत वाढ झाल्याचे दिसून येते. रमजान महिन्यानिमित्त नियमीत नमाजला जाणार्या लोकांना इदगाहकडे जाणार्या रस्त्यावरील खड्डे व त्यात पावसामुळेसाचणारे पाणी, रस्त्या लगतच्या नाल्यांमधून रस्त्यावर वाहणारे घाण पाणी याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळयापुर्वी केली जाणारी नालेसफाई यावर्षी न करण्यात आल्यामुळे घाण पाण्याची ही समस्या सर्व शहरभर पसरली आहे. त्यामुळे चिखलीतील बाबु लॉज चौक, चिंच परीसर, गांधी नगर, जुनेगांव, संभाजी नगर, इंदिरा नगर, यासह अनेक भागात डुकरांचा हदौस वाढला आहे. बाजार परीसरात तर बाजार करून जाणार्या नागरीकांच्या थैल्या रस्त्यावर डुकरे मानसांच्या मागे लागून तोडतात. एवढा उपद्रव डुकरांचा वाढला आहे. पावसाळयापुर्वी नियमीतपणे साफ केल्या जाणारा लेडी नाला व मोठ मोठया नाल्या यावर्षी साफ केल्या गेल्या नाहीत. त्यामुळेहीशहरातील घाणीत भर पडून वातावरण दुषीत झाले आहे. पावसाळयाच्या दिवसातील उद्भवणारी रोगराई पाहता केली जाणारी फवारणी अद्याप करण्यात आलेली नाही. तर पथदिव्यांची दुरुस्ती न झाल्याने अनेक भागात सार्वजनीक पथदिवे बंद असल्याने रात्री नागरीकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर असलेले खड्डे न बुजविल्याने त्यात पावसाळयाचे पाणी साचून रात्री पथदिव्या अभावी प्रवास करणार्या नागरीकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. तरी त्यावर तात्काळ उपाय योजना करण्यात यावी यासाठी निवेदन चिखली शहर कॉगे्रस कमिटीच्या वतीने आज 16 जुन रोजी देण्यात आले. हे निवेदन देण्यासाठी शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, नगर परिषदचे गटनेते रफिक सेठ, विरोधी पक्षनेत्या संगिताताई गाडेकर, नगरसेवक आसिफ भाई, विलास कंटूले, दिपक खरात, राउफ भाई, शालीनीताई थोरात, सुनिल कासारे, सुनिता शिंगणे, शमीमबी राजु रज्जाक, डॉ. मोहमंद इसरार, विजय गाडेकर, दिपक थोरात, सलीम मेमन, राजु रज्जाक, प्रशांत देशमुख, नजिर कुरेशी, कैलास खराडे, शाम वाकदकर, तुषार भावसार, सुचित भराड, अॅड. विलास नन्हई, तसेच गावातील असंख्य नागरीक हे चिखली नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या कक्षात पोहचले. निवेदन दिल्यावर झालेल्या चर्चेत या प्रश्नाची तीव्रता समोर आल्याने मुख्याधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना बोलावून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. चिखली शहर कॉगे्रस कमिटीच्या या निवेदनावर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट करून तसे निर्देश दिल्याने लवकरच नगर परिषद प्रशासन या समस्या मार्गी लावून नागरीकांना दिलासा देईल अशी अपेक्षा व्यक्त करीत जर यात विलंब झाला तर चिखली शहर कॉगे्रस कमिटी आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
