Breaking News

भाजप सरकारने समाजमाध्यमांना दिलेले स्वातंत्र्य लोकशाही बळकट करणारे - सुरेश प्रभू

मुंबई, दि. 27 - भाजप सरकार या देशात विकास आणि स्वातंत्र्य देण्याचे काम करीत आहे. भाजप सरकारने समाजमाध्यमांना दिलेले स्वातंत्र्य हे लोकशाही बळकट  करणारे आहे. तसेच समाज माध्यमांवरील अविष्कार हा सुदृढ लोकशाही असल्याचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.
मुंबई भाजपतर्फे आज दादर वसंत स्मृती सभागृहात आणीबाणी विरोधी दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी आणीबाणीच्या विरोधात लढा देणार्‍या जेष्ठ  नागरिकांचा ग्रंथ देऊन सन्मान केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार  होते. तर कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबईचे संघटन मंत्री सुनिल कर्जतकर, महामंत्री सुमंत घैसास उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रीय  मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, या देशातील आणीबाणी खर्‍या अर्थाने जनतेने उधळून लावली. त्यावेळी उभे राहिलेले जनआंदोलन अभूतपूर्व होते. अठ्ठावन्न दिवसांच्या  आणीबाणीनंतर जेव्हा निवडणुका लागल्या त्यावेळी आज सारखी प्रसिद्धीमाध्यमे आणि इंटरनेट उपलब्ध नव्हते. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते अटकेत होते. अशावेळी  इंदिरा गांधी आणि तत्कालीन आणीबाणी समर्थकांच्या विरोधात या देशात जनमानसात प्रक्षोभ निर्माण झाला. महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम लेखक पु.ल. देशपांडे यांनी  आणीबाणीच्या विरोधात उडी घेतली. अशी अनेक माणसे या विरोधात उभे राहीले आणि त्यावेळच्या निवडणुका अभूतपूर्व झाल्या. आणि देशात सत्तांतर झाले. 1977  च्या निवडणूकांमध्ये जनतेमध्ये जोश जो पाहिला तो फारसा पुन्हा कधी दिसला नाही. आणीबाणी उलथून लावण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मोठा वाटा होता.  अशा गोष्टींचा आठवण का करायची कारण अशा गोष्टी आपण विसरलो तर त्या पुन्हा निर्माण होण्याची अप्रत्यक्ष संधीच आपण उपलब्ध करून देतो की काय असे मला  वाटते, असे सांगत प्रभू यांनी आणीबाणीच्या काळातील अनेक प्रसंग आणि जनतेने दिलेला लढा यावर प्रकाशझोत टाकला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, आजच्या दिवशी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे एकच भूमिका आहे की नव्या पिढीला  हा देशातील आणीबाणीचा काळा इतिहास माहित होण्याची गरज आहे. या देशात इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लादली ती आपल्या राजकीय स्वार्थापोटी लादली  होता हा इतिहास आहे आणि तरीही आज या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर सहिष्णूता आणि असहिष्णुतेच्या गोष्टी काँग्रेस करत आहे.  असहिष्णूतेच्या खोट्या गोष्टी उपस्थित करून भाजप सरकार ला आरोपीच्या पिंजर्‍यात उभ केले जात आहे. हे काम कोण करते आहे तर ज्यांनी या देशात आणीबाणी  लादली ते काँग्रेस, म्हणून आजही आणीबाणीचा तो काळा इतिहास नव्या पिढीला माहित व्हावा त्यातील दाहक वास्तव आजच्या पिढीसमोर मांडले जावे म्हणून या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात आणीबाणीतील प्रसंग आणि त्यावेळच्या  परिस्थितीचा सविस्तर उहापोह केला.