Breaking News

सर्वात मोठी लोकशाही देशात विकासात्मक योजना राबविण्यात शासन यशस्वी - हरिभाऊ बागडे

मुंबई, दि. 28 - जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि 100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या विकासासाठी शासन सक्रीय आहे. देशात व राज्यात  कामगार, महिला व बालविकास, ऊर्जा प्रश्‍न, पाणी आदी प्रश्‍नासंदर्भात विविध योजना यशस्वीरित्या राबविल्या असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी  आज येथे सांगितले. विधानभवनात ऑस्ट्रेलियाच्या कामगार पक्षाचे प्रतिनिधी व सल्लागार संसदीय शिष्टमंडळाने विधिमंडळाच्या पिठासीन अधिका-यांची सदिच्छा भेट  घेतली. यावेळी श्री. बागडे हे बोलत होते. यावेळी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, आमदार कॅप्टन आर. तलीम सेल्वन, अध्यक्षांचे सचिव सागर कुमार, शिष्टमंडळात  विधानसभा सदस्य सॅली टालबोट, मेंबर ऑफ पार्लामेंट मॅडलीन ओजील्वी, विधानसभेचे सदस्य कॅट वॉर्डन, राष्ट्रीय कामगार संघटनेचे गॅरी मास, पलानी थिवर,  जेनीफर लाईट, ब्रीट मार्यनिक, विकी ब्युरो, अबी राजकुमार आदी ऑस्टेलियाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.बागडे यांनी कामगार, शेती, निवडणूक या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाला राज्याच्या शासकीय आणि विधीमंडळ  कामकाजासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेने देशाची लोकसंख्या जास्त असून,  शिस्त आणि स्वच्छतेबाबत शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्वच्छता अभियान देशभर यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या देशाला हजारो वर्षाची पंरपरा आणि  संस्कृती लाभली असून, सहकाराची भावना लोकांच्या मनात रूजली आहे आणि त्यामुळेच लोकशाही समृध्द झाली असल्याचेही श्री. बागडे यांनी यावेळी सांगितले.