Breaking News

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री निधीस 25 लाख

मुंबई, दि. 28 - राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर त्यासाठी आपलेही योगदान असावे या भावनेने विविध  व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी मुंबईतील हरमन फिनोकेम या संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीस 25 लाख रुपयांचा धनादेश दिला  आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीबद्दल संस्थेचे विशेष आभार मानले आहेत. आज हरमन फिनोकेमचे व्यवस्थापकीय संचालक श्री. भुपींदरसिंह मनहास यांनी  मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन त्यांच्याकडे 25 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हेही यावेळी उपस्थित होते.  अडचणीतील शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेला कर्जमाफीचा निर्णय कृषी क्षेत्राला दिलासा देणारा असून संस्थेने कृषी हिताच्या  उपक्रमामध्ये सातत्याने सहभाग दिला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक निर्णयासाठी आपलेही सहकार्य असावे या भावनेने ही मदत केल्याचे श्री. मनहास यांनी सांगितले.  शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी राज्यातील मंत्री आणि आमदारांनीही आपला एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.