Breaking News

बोट्यात आढळला बिबट्याचा मृतदेह

संगमनेर, दि. 29 - तालुक्यातील बोटा व केळेवाडी शिवारात धुमाकूळ घालणारा 9 वर्षाचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ही घटना काल बुधवारी सकाळी उघडकीस आली. बिबट्याचा मृत्यु निमोनिया झाल्याचे वनपरिमंडल अधिकारी बी. एस. काळे यांनी साांगितले.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील बोटा व केळेवाडी परिसरात शेळ्या, मेंढ्या व कुत्रे यांचा फडवा पाडत शेतकर्‍यांच्या पशुधनावर बिबट्याने चांगलाच डल्ला मारला आहे. बोटा  शिवारातील शेतकरी शरद भागवत शेळके यांच्या गट नंबर 1118 मधील शेतात काल बुधवारी सकाळी 9 वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचा मृतदेह आढळून आला. काही शेतकर्‍यांना भल्या सकाळी हा बिबट्या दिसला. त्यांनी लागलीच वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बी. एस. काळे, वनरक्षक आर. के पवार, जाकीर राजे, वनमजूर अनंता काळे, तान्हाजी फापाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान वनविभागाने घटनेचा पंचनामा केला. बिबट्याचा मृतदेह चंदनापुरी येथील रोपवाटीकेमध्ये नेवून शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा निमोनियाने मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी साांगितले. यावेळी बिबट्याचा मृतदेह पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याच्या मृत्युने प्राणी मित्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.