Breaking News

शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा गळा घोटणार्‍या मोदी सरकारविरुद्ध लढण्यास सज्ज व्हा : दिलीपकुमार सानंदा

बुलडाणा, दि. 29 - शाहू महाराज समतेचे पुरस्कर्ते होते. दलित समाजाच्या मुला-मुलींना फी माफी दिल्याशिवाय शिक्षण घेऊ शकणार नाही म्हणून त्यांनी सर्वात प्रथम फी माफ केली. या उलट मोदी सरकारने संतापजनक परिपत्रक काढून उच्च शिक्षण घेणार्‍या एससी,एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांना यापुढे आर्थिक मदत करता येणार नाही, असे जाहीर केले. काँग्रेस सरकारच्या वेळेस सुरु असलेली दलित समाजाची आर्थिक मदत बंद करुन मोदी सरकारने शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा गळा घोटला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. 26 जून रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, कृउबासचे सभापती संतोष टाले, सुरेशसिंह तोमर, अशोक मुळे, विश्‍वपालसिंह जाधव, अजय तायडे, नगरसेवक शे.फारुक बिस्मिलाह, समद टेलर, ज्ञानेश्‍वर सुळोकार, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना सानंदा म्हणाले की, आधुनिक भारताचे भाग्य विधाते, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार व विविध क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. समाजातील गोर गरीब, उपेक्षित घटकाच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य दिले. त्यांनी सामाजिक सुधारणा व शिक्षणावर भर दिला. वस्तीगृह, प्राथमिक, माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्थाही उघडल्या. औद्योगिक, व्यवसायिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या. मात्र, मोदी सरकारने मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने दलित विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क व इतर खर्च वसूल करण्याचा निर्णय घेणारे परिपत्रक काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद केले. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात शाहू महाराजांचे स्थान अमूल्य आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी विद्या, कला, व्यापार, उद्योग क्षेत्रात नव चैतन्य निर्माण केले होते. मात्र भाजप सरकार या उलट करीत आहे. शाहू महाराज हे पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, असेही दिलीपकुमार सानंदा यावेळी म्हणाले. सुरुवातीला जनसंपर्क कार्यालयात शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचलन अशोक मुळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार चंदेल, बाळू पाटील, अवधुत टिकार, धिरज मिश्रा, सचिन शर्मा यांनी प्रयत्न केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.