Breaking News

योगाच्या जनजागृतीसाठी शहरात रॅली काढून ; रोज योगा करण्याची शपथ

अहमदनगर, दि. 22 - आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त नेहरु युवा केंद्र व बलसागर फिटनेस सेंटरच्या वतीने बागडपट्टी येथील सिताराम सारडा विद्यालयात योग  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबीरात युवकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित युवक-युवतींनी योग व प्राणायामाच्या जनजागृतीसाठी  शहरात रॅली काढून, निरोगी जीवनासाठी दररोज योगा करण्याची शपथ घेतली.
योग शिबीराचे उद्घाटन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी अ‍ॅड.महेश शिंदे, योगीता देवळालीकर, पोपट बनकर, नैना  बनकर, सलिम सय्यद, अ‍ॅड.भानुदास होले, प्रकाश डोमकावळे, कांतीलाल जाडकर, श्रीकांत जाधव, शुभम मतकर, नैना अडगटला, प्रा.सुनिल मतकर, मंजूश्री रॉय  आदिंसह नेहरु युवा केंद्राचे जिल्ह्यातील स्वयंसेवक, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, युवा मंडळ व महिला मंडळाचे प्रतिनिधी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबाजी गोडसे म्हणाले की, अध्यात्मिक मंत्रोपचाराला अंधश्रध्दा न मानता त्या मागचा वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेणे गरजेचे आहे. निरोगी व आनंदी जीवनासाठी योग  महत्त्वाचा आहे. युवकांनी अध्यात्म व विज्ञानाची सांगड घातल्यास महाशक्ती बनणार असल्याची आशा व्यक्त केली.
योग शिबीरात आंतराष्ट्रीय योग शिक्षक सागर सुरपुरे, सहशिक्षक अजय गव्हाणे, उत्कर्ष गीते व वनिता बोरसे यांनी उपस्थित युवक-युवतींना योगाचे धडे विविध आसन  प्रात्यक्षिकासह करुन, त्याचे महत्त्व विशद केले. तसेच प्राणायाम व ध्यान धारणेबद्दल माहिती दिली.  आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीचे  शहरातील प्रमुख मार्गावरुन संचलन होवून, वाडियापार्क येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ समारोप झाले. रॅलीत सहभागी युवकांनी करा योग, रहा निरोग च्या  जोरदार घोषणा दिल्या.