Breaking News

शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते - शरद पवार

पुणे, दि. 22 - छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. अफझलखानाला त्यांनी मुस्लिम म्हणून नव्हे तर स्वराज्याचा शत्रू म्हणून मारले  होते. गो-ब्राह्मण प्रतिपालक ही शिवाजी महाराजांची रंगवण्यात आलेली प्रतिमा अ-ऐतिहासिक आहे. समाजातील तरुण पिढीसमोर काही लोकांकाडून जाणीवपूर्वक  चुकीचा इतिहास मांडला जात असून, त्याला यश मिळत आहे. हा सर्व प्रकार अस्वस्थ करणारा आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी  केले. 
महात्मा ज्योतिबा फुले इतिहास अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी  ते बोलत होते. या प्रसंगी कोल्हापुरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ.  जयसिंगराव पवार, लेखक श्रीमंत कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले की, इतिहासात समाजावर परिणाम करण्याची ताकद आहे. पण चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला गेल्यामुळे समाजाची मानसिकता देखील त्या पद्धतीने  वाहत असल्याचे पाहायला मिळते. शाळेत शिकवला जाणारा इतिहास शिक्षकांनी जे शिकवले त्यावर आधारित होता. शिक्षण देण्याचे काम हे विशिष्ट वर्गाला होते.  त्यामुळे त्यांनी हवा तसाच इतिहास मांडला. आधारभूत इतिहासाची मांडणी करण्यासाठी अनेक पिढ्या गेल्या आहेत. त्यामुळे आधारभूत इतिहास पुढे येण्याची गरज  असल्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अफजल खान हा प्रस्थापित राज्याच्या विरोधात लढण्यास आला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. अफजल खान मुस्लिम  होता म्हणून त्याला महाराजानी मारले नाही. तर तो प्रस्थापित राज्याच्या विरोधात असल्याने त्याचा कोथळा काढला काढला. शिवाजी महाराज कधीच मुस्लिम  समाजाच्या विरोधात नव्हते. ते रयतेचे राजे होते. देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांच्या नावाने त्या राज्याची ओळख आहे. मात्र महाराष्ट्र हे रयतेचे राज्य म्हणून  आजही ओळखले जाते. ते कधी भोसलेच राज्य म्हणून ओळखले जात नाही, असेही ते म्हणाले.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण ही उपाधी दिली होती. मात्र, नंतर त्यांना गो-ब्राह्मण प्रतिपालक ठरवण्यात आलं. प्रत्यक्षात तसं  नाही. गो-ब्राह्मण प्रतिपालक ही शिवाजी महाराजांची रंगवण्यात आलेली प्रतिमा अ-ऐतिहासिक आहे. इतिहासकार त्र्यंबक शेजवलकरांनी तसं नमूद करून ठेवलं आहे,  अन्यथा, अफझलखानाचा वकील असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाचला असता. पण त्यालाही शिवरायांनी सोडलं नाही, असं पवार म्हणाले. शिवाजी  महाराजांचा नौदल प्रमुख एक मुस्लिम माणूस होता, याकडंही पवार यांनी लक्ष वेधले.