Breaking News

मनोबलची प्रांजल पाटील महाराष्ट्रातील पहिली प्रज्ञाचक्षु आयएएस

जळगाव, दि. 02 - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल नुकताच निकाल जाहीर झाला असून दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थी व मार्गदर्शकांनी  घवघवीत यश संपादन केले आहे. दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाची मार्गदर्शिका प्रज्ञाचक्षु (अंध) प्रांजल लहेनसिंग पाटील हिने 124 गुणानुक्रम पटकावून आय ए एस पदी  निवड झाली आहे. तसेच दीपस्तंभ मुलाखत प्रशिक्षणाच्या विद्यार्थीनी व मनोबल केंद्राच्या मार्गदर्शिका अल्पना दुबे यांनी 654 गुणानुक्रम पटकाविला आहे.
तसेच जळगाव येथील योगाप्रशिक्षक हेमांगीनी सोनवणो यांचे चिरंजीव सौरभ संजय सोनवणो यांनी 293 गुणानुक्रम पटकविला आहे. पाचोरा येथील प्राथमिक शिक्षक  संजय महाजन यांचे चिरंजीव मनोज सत्यवान महाजन यांना 903 गुणानुक्रम मिळाला आहे. तसेच मुक्ताईनगर येथील डॉ कुलदीप सुरेश सोनवणो यांना 384 गुणानुक्रम  मिळाला आहे.चोपडा तालुक्यातील तावसे खु येथील स्वेच्छा नवृत्त पोलीस दिलीप पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील 824 गुणानुक्रमाने उत्तीर्ण झालेत.तसेच चोपडा  येथील आशिष पाटील हे देखील उत्तीर्ण झालेत. दीपस्तंभ परिवाराचे सदस्य नागपूर येथील पुनीत डागा 271 क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. रतनलाल सी बाफना ,  पुखराज पगरिया, भरत अमळकर , यजुर्वेन्द्र महाजन यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले. मनोबल प्रकल्पाचे संचालक यजुर्वेन्द्र महाजन यांनी आपली प्रतिक्रिया देताना  सांगितले की, प्रांजल चे यश संबंध भारतातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे,मागील वर्षी त्यांना भारतीय कस्टम सेवेत पद मिळाले परंतु जिददीच्या बळावर तिने आय ए  एस चे शिखर सर केले,तिच्याकडून प्रेरणा घेऊन अल्पना दुबे या अंध भगिनीने यश मिळविले आहे.