Breaking News

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

लखनौ, दि. 22 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे लोकसभा खासदार राम प्रसाद सरमा यांच्याविरुद्ध आसाममधील एका महिलेने तक्रार  दाखल केली. 10 वर्षापुर्वी झालेल्या एका आंदोलनादरम्यान महिलेचे छायाचित्र काढण्यात आले होते. हे छायाचित्र समाज माध्यमामध्ये प्रसिद्ध केल्यामुळे महिलेने  न्यायालयात धाव घेतली आहे.
लक्ष्मी ओरंग असे या महिलेचे नाव असून तिने भारतीय दंडसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमाअंतर्गंत तक्रार दाखल केली आहे. तसेच मुख्यमंत्री  आदित्यनाथ यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. 24 नोव्हेंबर 2007मध्ये गुवाहाटी येथे अखिल आसाम आदिवासी विद्यार्थी संघटनेने आंदोलन  केले होते. यावेळी महिलेचे विवस्त्र छायाचित्र काढण्यात आले होते. हे छायाचित्र योगी आदित्यनाथ यांनी 13 जून रोजी समाज माध्यमावर पोस्ट केले होते. हेच  छायाचित्र खासदार राम प्रसाद सरमा यांनी शेअरही केले होते, असे पीडित महिलेने सांगितले.