Breaking News

कितीही गुन्हे दाखल करा : दिलीपकुमार सानंदा

बुलडाणा, दि. 07 - बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या या रास्त मागण्यांसाठी शेतकरी बांधवांनी 5 जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने खामगाव शहरात भाजप वगळता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, एमआयएम, विदर्भ विकास अमन पार्टी, मनसे यांनी शेतकरी बांधवांच्या बंदला पाठिंबा दिला. नेत्यांच्या आवाहनावर खामगाव शहर व परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून आंदोलनाला साथ दिली. 
आंदोलन सुरु असताना कृषीमंत्र्यांच्या इशार्‍यावर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, शिवसेनेचे प्रा.अनिल अंमलकर, शहराध्यक्ष सुनील अग्रवाल, प्रा.सुधीर सुर्वे, संजय अवताडे, अखिल भारतीय किसान सभेचे नेते जितेंद्र चोपडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती  संतोष टाले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शांताराम पोटेखेडे, नगरसेवक प्रविण कदम, आंदोलनकर्ते शेतकरी बांधवांसह एकूण 60 जणांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर कलम 341 व कलम 135 अन्वये गुन्हे दाखल केले. पालकमंत्र्यांच्या दबावाखाली आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याबाबत शेतकरी बांधवांनी पालकमंत्री फुंडकर व पोलिस अधिकार्‍यांचाही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
शेतकरी बांधवांना शांततेच्या मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी त्याची आपणास पर्वा नाही, असे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी यावेळी सांगितले. तर शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडणार्‍या फुंडकरांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय   राहणार नाही, असा इशाराही सानंदा यांनी यावेळी दिला.