Breaking News

अ. भा. पद्मब्राह्मण संघाचे अधिवेशन श्रीशैलमला

पुणे, दि. 27 - अखिल भारतीय पद्मब्राह्मण पुरोहित संघाचे 19 वे अधिवेशन श्रीशैलम (आंध्र प्रदेश) येथे आयोजित केले आहे. 15 आणि 16 जुलै असे दोन दिवस हे अधिवेशन होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष वेंकटेशम गड्डम (पंतुलु) यांनी दिली. या अधिवेशनासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश येथील पुरोहित प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले. अखिल भारतीय भक्त मार्कंडेय पद्मशाली नित्य अन्नसत्रम् हे अधिवेशन स्थळ आहे. पहिल्या दिवशी कुंभकळस आणि रूद्राभिषेक होईल. सभाध्यक्ष गड्डम पंतुलु यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि त्यानंतर पुरोहितांचा परिचय, त्यांच्या विषयांवरील चर्चेला प्रारंभ होणार आहे. दुसर्‍या दिवशी (16 जुलै) पहाटे पाचला कुंभकळस पदयात्रा काढण्यात येईल. सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत होणार्‍या खुल्या अधिवेशनात ठराव मांडण्यात येतील. रात्री आठला उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर समारोप होणार असल्याचे श्री. गड्डम यांनी सांगितले. या अधिवेशनात ’पद्मपीठ’चे संपादक भास्कर कोक्कूल यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्याशिवाय गुरुशिरोमणी डॉ. अंजनेय आमंची (राजमंड्री), वास्तुब्रह्मा डॉ. वेंकटराव कटकम (हैदराबाद), शंकराचार्युलू कोडम (वरंगल) आदी उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील पुरोहितांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.