Breaking News

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढविणार-डॉ. दीपक सावंत

नाशिक, दि. 27 - आदिवासी भागातील रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन तज्ज्ञ डॉक्टर्स नियुक्त करण्यात येतील, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.
डॉ.सावंत यांनी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय आणि बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी आमदार जीवा पांडू गावीत, आरोग्य उपसंचालक डॉ.लोचना घोडके, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे आदी उपस्थित होते.
डॉ.सावंत यांनी ग्रामस्थ आणि रुग्णांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी भागातील वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्याबाबत शुक्रवारी स्थानिक स्तरावर बैठक घेऊन त्याचा अहवाल त्वरीत शासनास पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. आदिवासी भागात सॅम आणि मॅमचे प्रमाण कमी करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.