’माळीण’- पुनर्वसनानंतर पहिल्याच पावसामुळे घरांना गेले तडे
पुणे,दि.26 : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसातच बिकट अवस्था झाली आहे. 30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील हे गाव पूर्णपणे मातीच्या ढिगा-याखाली गाडले गेले होते. या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.त्यानंतर माळीणचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानूसार नवीन माळीण गावाचा चेहरा मोहरा बदलण्यात आला.
नवीन घर, नवीन शाळा बनविण्यात आल्या. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते नवीन माळीण गावाचं उदघाटनही करण्यात आले. मात्र पाहिल्याच पावसात पुनर्वसन कामाचे स्वरुप चव्हाट्यावर आले आहे.पहिल्याच पावसात गावातील रस्ते खचले असून तेथे बांधलेल्या घराच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. भिंतींना तडे गेल्यामुळे नागरिकांमध्ये भितीच वातावरण आहे. यामुळे नवीन गावात नुकताच संसार सुरू केलेले ग्रामस्थ स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसून येत आहे.माळीण गावाचा नकाशा बदलून महिन्याभरापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हस्थांतर सोहळा पार पाडण्यात आला होता. घटनेच्या दोन वर्षांनंतर सरकारने गाजावाजा करत स्मार्ट व्हीलेज म्हणून माळीण गावाचं उद्घाटन केले. मात्र उद्घाटनानंतर महीनाभरातच नविन माळीणची बिकट अवस्था झाल्याच चित्र समोर आले आहे.