पावसाअभावी खरीप पेरण्या धोक्यात!
चिखली तालुक्यात 80 टक्के पेरण्या आटोपल्या, शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे
बुलडाणा, दि. 22 - चिखली तालुक्यात जवळपास 80 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. बीजांना अंकूरही फुटले आहेत. मात्र, पावसाअभावी अंकूर जमिनीच्या वर येण्याआधीच सुकायला लागले आहेत. आणखी दोन ते तीन दिवसांत पाऊस न आल्यास बियाणे जमिनीतच करपून जाण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग सध्या चिंतातूर झाला आहे.शेतकरी वर्ग आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेला आहे. अशातच यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने शेतकर्यांनी बँका, पतसंस्था तसेच सावकारांकडून कर्ज घेवून व उसनवारी करुन बी-बियाणे, खते खरेदी करुन काळ्या आईची ओटी भरली. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोहिणी नक्षत्रामध्ये चिखली तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांनी लगोलग पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून आठवडाभरातचपेरणी केली. यंदा पावसाने लवकर सुरुवात केल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. लवकर पेरणी केल्याने आपल्याला चांगले उत्पन्न होईल या आशेने शेतकर्यांनी पेरणीयंत्रांच्या सहायाने झटपट पेरणी करुन करुन काळ्या आईची ओटी भरली. जवळपास 80 टक्के पेरण्याही पूर्ण झाल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरणीची कामे आठवडाभरातच पूर्ण झाली आहेत. मात्र,पेरणी झाल्यापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकर्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. लाखो रुपयांचे बी-बियाणे जमिनीत टाकल्यामुळे ते बियाणे पावसाअभावी आता जमिनीतच करपून जाते की काय असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
यंदा हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरेल या आशेने शेतकर्यांनी जून महिन्या पहिल्याच आठवड्यात कपाशीची लागवड केली. त्यातही पावसाने आठवडाभरापासून दडी मारल्याने कपशीच्या पिकाला जमिनीच्या वर येण्याआधीच फटका बसला आहे. कपाशी आणि मका पिकाचे बियाणे पावसाअभावी जमिनीत खराब होत आहे. तर पेरणीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांनाही आता पाऊस कधी पडेल याची चिंता लागली आहे.
येत्या दोन तीन दिवसात पाऊस आला नाही तर मका व कपाशीचे जमिनीत टाकलेले बियाणे पूर्णपणे खराब होण्याची भिती शेतकर्यांना वाटत आहे. यापूर्वी पावसाच्या लहरीपणामुळे चिखली तालुक्यातील शेतकर्यांना अनेकदा दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. हे प्रकार आता चिखली तालुक्यातील शेतकर्यांसाठी नेहमीचेच झाले असल्याचेही शेतकरी बोलतात.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून दररोज सायंकाळी आकाशात ढग जमा झालेले दिसतात मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांची कमालीची निराशा होत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर आपल्याला दुबार पेरणीचा सामना करावा लागेल, त्यासाठी आता बि-बियाणे व खते पुन्हा कशी आणावी हिच चिंता सध्यातरी शेतकर्यांना सतावत आहे.