तणावग्रस्त पालकांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
बुलडाणा, दि. 22 - शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील पांल्यांसाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25 टक्के विनामूल्य प्रवेश खासगी नामांकित देण्याचे निर्देश प्रत्येक शाळेला दिले आहेत. पालकांनी 25 टक्के अंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून ऑनलाईन अर्जसादर केलेले आहेत. त्यानुसार पालकांना प्रवेश निश्चिती झालेली असतांना अद्यापपर्यंत पहिल्या फेरीतीलच बालकांचा त्या-त्या शाळांमध्ये प्रवेश झालेला नसताना दुसरी फेरी ही चालू झालेली आहे. तर पहिल्या फेरीत पात्र असूनही अद्यापपर्यंत प्रवेशासाठी शाळांभोवती फेर्या मारणार्यांचे प्रवेश केव्हा होणार याबाबत पालकवर्ग त्रस्त असून डोणगाव येथील एका तणावग्रस्त पालकांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना माझ्या मुलाचा प्रवेश कधी होणार की केवळ कागदावरच शाळा 25 टक्के प्रवेश पूर्ण करणार तणावग्रस्तांना पुन्हा तणाव देणार याबाबत अर्ज देऊन त्वरित मुलांचा प्रवेश करावा, अशी मागणी केली आहे.
डोणगाव येथील विजय रामभाऊ खरात या तणावग्रस्त पालकाने आपल्या शिवम नावाच्या मुलाचा इयत्ता पहिलीमध्ये सहकार विद्या मंदिर डोणगाव येथे प्रवेश मिळावा म्हणून शासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्जसादर केला व तो पात्र ठरला. त्यानंतर 21 एप्रिल 2017 रोजी सर्व कागदपत्रे असलेली फाईल शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करुन पोच सुध्दा घेतली. परंतु अद्यापपर्यंत त्यामुलाचा प्रवेश निश्चित झालेला नाही. प्रवेशासंबधी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात वारंवार भेट दिली. तरीही तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. प्रवेशाची अंतिम मुदत 21 जून असल्याने माझ्या मुलाचा प्रवेश त्वरित करून मला न्याय द्यावा, अशी तक्रारच विजय खरात यांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.