Breaking News

लोकशाही दिनाची पत्रकार परिषद आता प्रत्येक महिन्याला

बुलडाणा, दि. 02 - लोकशाही दिनात जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लोकाभिमुख करण्यासाठी दर महिन्याच्या लोकशाही दिनानंतर घेण्यात येणारी पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची ठरते. मात्र मागील काही महिन्यांपासुन जिल्हा प्रशासनाने ही पत्रकार परिषद घेणे बंद केले होते. ही पत्रकार परिषद घेण्यात यावी यासाठी आज शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुुंडवार यांना निवेदन दिले असता जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या कार्यतत्परतेचा परिचय देत पत्रकारांच्या या मागणीला तात्काळ मंजुरात दिली आणि दर महिन्याला लोकशाही दिनानंतर पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. याप्रसंगी सहा.जिल्हा माहिती अधिकारी निलेश तायडे यांनीही पत्रकारांच्या निवेदनाची जिल्हाधिकारी महोदयांपुढे सकारात्मक मांडणी केली.
जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही दिन घेण्यात येते. या लोकशाही दिनात विविध विभागात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जनतेला होण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची पद्धत होती. मात्र मध्यंतरीच्या काळात ती बंद करण्यात आली. जिल्हा प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी व पत्रकारांचा शासनाच्या विविध विभागांशी सुसमन्वय स्थापीत करण्यासाठी पत्रकार परिषदेचा ही विकासाभिमुख उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर लोकशाही दिनाची पत्रकार परिषद घेण्यास जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी अनुमती दिली आहे.
या निवेदनावर पत्रकार सर्वश्री कासिम शेख, रणजितसिंग राजपुत, चंद्रभुषण मुंगे, चंद्रकांत बर्दे, दिपक मोरे, संजय काळे, सुधीर देशमुख, संदीप वंत्रोळे, अमोल गावंडे, लक्ष्मीकांत बगाडे, युवराज वाघ, नितेश तांबोळे, संदीप वानखेडे, वसीम शेख, नितीन शिरसाठ, संजय जाधव, प्रेमकुमार राठोड, भानुदास लकडे, सुभाष लहाने, विवेक चांदुरकर, पवन सोनारे इत्यादिंची निवेदनावर स्वाक्षरी आहे. अनेक दिवसांपासूनची ही मागणी नवीन जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर केल्यामुळे पत्रकारांनी आनंद व्यक्त केला आहे.