675 लिटर रॉकेलसह दोन घरघुती गॅस सिलिंडर जप्त
देऊळगाव राजा येथील गुरुकृपा स्विटमार्टवर गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा
बुलडाणा, दि. 02 - बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने देऊळगाव राजा येथील गुरु कृपा स्विटमार्टवर 30 मे रोजी धाड टाकली. यावेळी दुकानात 675 लिटर निळया रॉकेलच्या साठ्यासह घरघुती वापराचे दोन गॅस सिलेंडर, असा पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी आरोपी हॉटेल मालकास अटक करण्यात आली आहे.देऊळगाव राजा येथील जुना जालना रस्त्यावर असलेल्या गुरुकृपा स्विटमार्टमध्ये दुकानमालक भवरसिंग हुकुमसिंग राजपुरोहीत याने 675 लिटर निळया रॉकेलचा अवैधरित्या साठा करुन ठेवला असून हॉटेलमध्ये घरघुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर करण्यात येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर,पोलीस हवालदार सय्यद हारुण, नापोकॉ विलास साखरे, गजानन आहेर,विजय दराडे, अविनाश जाधव, पोलीस शिपाई विवेक तायडे यांनी 30 मे रोजी उपरोक्त ठिकाणी छापा टाकला. यावेळी दुकानात असलेल्या चार ड्रममध्ये 675 निळे रॉकेल तसेच घरघुती वापराचे दोन गॅस सिलेंडर मिळून आले. सदर रॉकेल व सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर केल्याजात असल्याचेही यावेळी निदर्शणास आले. या प्रकरणी आरोपी दुकानमालक भवरसिंग हुकुमसिंग राजपुरोहीत याच्या विरुध्द ईसी अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून 3 लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान उपरोक्त आरोपीस 31 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. निळ्या रॉकेलची रेशन दुकानदारांकडून काळ्या बाजारात सर्रास विक्री केल्या जात आहे. तसेच घरघुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर केल्या जात असल्याने सर्वसामान्यांना रॉकेल व गॅस सिलेंडरपासून वंचीत राहावे लागत आहे. असे असताना पुरवठा विभागाचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. दरम्यान रॉकेल व घरघुती गॅस सिलेंडरचा होणारा व्यवसायासाठी होणारर वापर रोखण्यासाठीपोलीस अधीक्षक शशी कुमार मीना यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुढे सरसावला असून त्यांच्याकडून हॉटेल्सची झाडाझडती घेण्यात येत आहे.
