Breaking News

राष्ट्रपती निवडणूक : काँग्रेसकडून मीराकुमार यांना उमेदवारी

नवी दिल्ली, दि. 23 - राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या विरोधात काँग्रेस आणि विरोधकांनी मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधकांच्या  बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यासंदर्भात घोषणा केली. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात 16 विरोधीपक्षांची गुरुवारी  दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीएम, सीपीआयसह इतर पक्षांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू म्हणजे  जनता दल युनायटेड पक्ष विरोधकांपैकी एक महत्वाचा पक्ष आहे. पण नितीश कुमार यांनी विरोधकांना पाठ दाखवल्याने विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्र आहे.  काँग्रेसनं मीरा कुमार यांचं नाव घोषित केलं असलं तरी एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.