Breaking News

शेतक-यांच्या संपाला हिंसक वळण, जयाजी सूर्यवंशी यांना मारहाण, संपाला संमिश्र प्रतिसाद

औरंगाबाद, दि. 02 - कर्जमाफी आणि हमीभावासाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या संपाला आज मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र औरंगाबादमध्ये या  संपाला हिंसक वळण लागले. औरंगाबाद येथे अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आली. नासिक - औरंगाबाद महामार्गावर  शेतकर्याचे दूध व भाजीपाला फेकून देण्यात आला. बीड जिल्ह्यात माजलगाव येथे दूधाचे कॅन फेकून देण्यात आले. लातूर, बीड येथे संपाला चांगला प्रतिसाद दिसून  आला. मात्र अनेक ठिकाणी व्यवहार सुरळीत चालू होते. बीड येथे किसान क्रांती दलातर्फे शेतकर्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. 
राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी  नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याच दरम्यान एका ट्रकची टायरमधील हवा सोडत  असताना व्यापार्यांनी एकत्र येऊन शेतकर्यांवर हल्ला केला. यात जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह 5 शेतकर्यांना मारहाण करण्यात आली, तर काही शेतकरी तेथून निघून  गेले. या घटनेमुळे औरंगाबादेत गोंधळ निर्माण झाला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी जवळपास अर्ध्याहून अधिक शेतकर्यांनी पाठिंबा देत बाजाराकडे पाठ फिरवली .  ज्या शेतकर्यांना आंदोलनाची माहिती नव्हती, ते शेतकरी उद्या संपामध्ये सहभागी होत आहेत. मात्र, व्यापार्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला तरी आंदोलन  सुरूच राहील अशी भूमिका शेतकर्यांनी घेतलीय. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्यांनी टोमॅटो, कांदे फेकत बाजार बंद करण्याचा प्रयत्नही केला. शेतकरी नेते  जयाजीराव सूर्यवंशी यांना व्यापार्यांची मारहाण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माळशिरस, मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर आदी भागात शेतकरी रस्त्यावर उतरले  असून दूध व शेतमाल रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करत आहेत.
लातूर जिल्ह्यात जवळपास सगळीकडेच शेतकर्यानी असहकार आणि आंदोलने सुरु केले. लातूरच्या नव्या गूळ मार्केट परिसरात सुरु असलेले नाफेडचे तूर खरेदी केंद्र  आज शेतकर्यांने लक्ष्य केले. या केंद्रासमोरचा रस्ता जाम केला. तूर खरेदी पुन्हा बंद पडली आहे. रस्त्यावर वाहनांच्या रांगा आहेत. तुरीचा उत्पादक शेतकरी  हवालदिल आहे. या शेतकर्यानी आज बाजार समितीला पत्र देऊन कामकाज थांबवले. सौदाही निघू दिला नाही. बसवेश्‍वर चौकातील वाहतूक बराच काळ ठप्प होती.  भीक नको हवे मालाचे दाम असं सांगत आपल्यावरील अन्याय अधोरेखित केला. तूर खरेदी ठप्प झाल्याने प्रश्‍न आणखी बिकट बनला आहे. तूर खरेदीबाबत पुढचे  आदेशच मिळाले नाहीत असं जिल्हा पणन अधिकार्यांचं म्हणणं आहे. तूर घेऊन येणार्यांना आम्ही टोकण देत आहोत असं बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर  अतिशय केविलवाण्या चेहर्यानं सांगतात, त्याला आम्ही काय करावं असा प्रश्‍न आगतिक झालेले शेतकरी विचारतात. पणन महासंघाला यावर तातडीनं पावलं उचलावी  लागणार आहेत. शेतकर्याशी सरकार बोलायला तयार आहे असं कृषी मंत्री सदाभाऊ खोत सांगतात.
आज लातुरच्या बाजारात नेहमीप्रमाणे दूध आले. पण त्याचं प्रमाण चाळीस ते पन्नास टक्केच होतं. या सर्वांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आजच्या संपाचा विषय  समजावून सांगितला. हे शेतकरी आपापला माल परत घेऊन गेले. उद्या माल घेऊन येऊ नका अशी विनंती त्यांना करण्यात आली. एवढं सांगूनही याल तर अडचणीत  सापडाल अशी समजही त्यांना देण्यात आली. लातूर, औसा, उदगीर, अहमदपूर, उदगीर आदी ठिकाणीही आंदोलने सुरु आहेत. सगळ्या बाजार समित्यांचे व्यवहार  ठप्प झाले आहेत.
बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी संघटनांनी संप यशस्वी करण्यासाठी आक्रमकता दाखविली असल्याचे वृत्त आहे. माजलगाव येथे आज सकाळी अगदी पोलिस  ठाण्याच्या समोर दूध घेवून येणार्या शेतकर्यांचे दुधाचे कॅन आंदोलनकर्त्यांनी ओतून दिले. विकण्यासाठी आणलेला भाजीपाला फेकून दिला. शेतीमालाला हमीभाव  मिळावा या मागणीसाठी पुकारलेल्या या आंदोलनात बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, केज, शिरसाळा येथे संपाला चांगला प्रतिसाद मिळाल. जातेगाव, पाचेगाव  येथील बाजारही आज बंद होते.
किसानक्र्रांती संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. येथील स्टेडिअमपासून सकाळीच हा मोर्चा निघाला.  औंदाचा नारा, नाही करायचा पेरा अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. भाई गंगाभीषण थावरे, सुशीला मोराळे, मोहन गुंड, पंजाब काकडे, जालींदर काकडे आदींनी या  मोर्चाचे नेतृत्त्व केले.