हर्सुल तलावाच्या परिसरात विकसित करणार जांभुळबन
औरंगाबाद, दि. 02 - लगत असलेल्या हर्सुल तलाव परिसरात जांभूळबन विकसित केले जात असून त्यामध्ये दालचिनी, काळीमिरी, लवंग, दगडफूल अशी अंतर्गत मसाला पीके घेण्यात यावीत. त्याचे सुयोग्य नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. जांभूळबनास आज पालकमंत्री रामदास कदम यांनी धावती भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर सुनीता घोगरे, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या जांभूळबनात अमृत वन अभियान नियोजित असून 1 कोटी रुपये यासाठी प्राप्त झाले असून एकूण 9 कोटीचा प्रस्ताव आहे, तो मंजूर करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. जांभूळबनाभोवती आर.सी.सी. वॉल कंम्पाऊंड बांधावी त्यासाठी देखील जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून 1 कोटी रुपयाचा प्राथमिक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री महोदयांनी आश्वासित केले. हर्सुल तलाव परिसरातील नगरसेवकांनी हर्सुल तलावातील पाणी पिण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करुन देण्याची यावेळी पालकमंत्री महोदयांना विनंती केली असता, त्यांनी पाणीपुरवठ्यासाठी पाईप लाईन टाकण्याचे अधिका-यांना आदेशित केले. हे काम तातडीने झाले पाहिजे असेही त्यांनी अधिकार्यांना सांगितले. नंतर पालकमंत्री आणि इतर उपस्थित मान्यवरांनी जांभूळबनात वृक्षारोपण करुन शुभेच्छा दिल्या. यानिमित्त शिवसेना प्रमुख अंबादास दानवे, नंदकूमार घोडेले, गजानन मनगटे, विकास जैन, सौ. पुनम बमने, नगरपालिकांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
