नांदेड जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिका-यावर डॉक्टर सुनेच्या खुनाचा गुन्हा दाखल
नांदेड, दि. 02 - नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदमाकर केंद्रे यांच्यावर डाँक्टर सुनेच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या मुळे खळबख उडाली आहे. काल दि.30 मे 2017 रोजी त्यांची डॉक्टर असलेली सूनबाई डॉ.चेतना विकास केंद्रे वय-25 हीचा मृत्यू झाला. आज चेतनाचे बंधू पोलीस उपनिरिक्षक राजू शामराव इंगळे रा.कांडली ता.परतवाडा जि.अमरावती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहिण डॉ.चेतना आणि पदमाकर केंद्रे यांचा पुत्र डॉ.विकास यांनी अंतरजातीय विवाह केला होता. या अंतरजातीय विवाहाला पदमाकर केंद्रे आणि इतरांची नापसंती होती. म्हणूनच पदमाकर केंद्रे यांच्यासह इतरांनी डॉ.चेतनाला रिकामे इंजेक्शन तिच्या शरिरात प्रवेश करून तिचा खून केला आहे. राजू इंगळे यांच्या या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी मयत डॉ.चेतना यांचा पती डॉ.विकास केंद्रे, त्याचे वडील पदमाकर केंद्रे , भाऊ राहुल केंद्रे, आई निर्मला केंद्रे, शिवाजी पाटील नावा कुणी माणूस आणि आधार हॉस्पिटलमधील डॉ.तानाजी पाथरपुडे यासर्वांनी मिळून डॉ.चेतनाचा खून केल्याप्रकरणी या सहा जणांविरुध्द भारतीय दंडविधानाच्या कलम 302, 354,323 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दिनेश काशिद, पोलीस कर्मचारी संतोष बनसोडे, प्रमोद मोरे आणि शंकर पेन्सलवार हे करीत आहेत.
