Breaking News

केंद्रीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला 9 राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. 20 - प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांसह केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्राला केंद्रीय  ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्रालयाच्या वतीने वार्षीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मंत्रालयांतर्गंत देशभर  राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार्‍या राज्यांच्या विविध संस्थांना यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.  केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल राज्यमंत्री रामकृपाल यादव, सचिव अमरजीत सिन्हा यावेळी उपस्थित होते. विविध श्रेणींमध्ये यावेळी पुरस्कार वितरीत  करण्यात आले. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, राज्य ग्रामीण रस्ते विकास विभागाचे सचिव व्ही. आर. नाईक यांच्यासह वरिष्ठ  अधिकार्‍यांनी हे पुरस्कार स्वीकारले.