Breaking News

मुक्ताई कारखान्याला बँकेने दिलेल्या 51 कोटींच्या कर्जावरून खडसे-महाजन वाद चिघळणार!

जळगाव, दि. 20 - संत मुक्ताई साखर कारखान्याला (मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा. लि.) जळगाव जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जावरून वातावरण तापले आहे. राज्याचे  जलसंपदा मंत्री व जिल्हा बँक संचालक गिरीश महाजन यांनी या कर्जास लेखी आक्षेप नोंदविला आहे. हा कारखाना कर्ज परतफेडीस सक्षम आहे का, अशी विचारणा  त्यांनी केली आहे. 
माजी महसूलमंत्री एकनाथ खंडसे यांच्या कन्या रोहिणी खेवलकर या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व मुक्ताई कारखान्याच्या उपाध्यक्ष आहेत. थेट रोहिणी खेवलकर यांच्या  निर्णयाला आक्षेप नोंदवत गिरीश महाजन यांनी प्रथमच एकनाथ खडसे यांच्या विरोधात खुलेआम शड्डू ठोकले आहेत. त्यातच मुक्ताई कारखान्याचे चेअरमन डॉ.  शिवाजी जाधव हे राष्ट्रवादीच्या दादा नेतृत्वाच्या खास मर्जीतील असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे मुक्ताई कारखान्याचा गळीत शुभारंभ व उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी केले होते.
यापूर्वी राज्य सरकारने मुक्ताई सूतगिरणीलाही 55कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात कासोद्याचा वसंत सहकारी साखर कारखाना अवघ्या 18  कोटींच्या थकीत कर्जामुळे बंद आहे. हा कारखाना चालविण्यात जिल्हा बँक अथवा राज्य सरकार उदासीन आहे. मध्यंतरी औरंगाबादच्या ’अजित सीड्स’वाल्या  पद्माकर मुळे यांच्या गंगामाई साखर कारखान्याने हा प्रकल्प भाड्याने चालवायला घेतला. मात्र, जिल्हा बँकेने आडमुठ्या भूमिकेने त्यांना पळवून लावले. चोपडा साखर  कारखानाही जिल्हा बँकेच्या असहकारामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. आजवर व्यवस्थित असलेल्या फैजपूरच्या साखर कारखान्याची अर्थव्यवस्थाही धोक्यात  आली आहे. आशा स्थितीत, काही कोटींच्या मदतीने तगू शकणारे जिल्हयातील दोन चालू असलेले सहकारी साखर कारखाने व उर्जितावस्था मिळू शकेल असा अन्य  एक सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेच्या सावत्र लेकरू वाटतात. नव्याने सुरू झालेल्या व्यवहारिकदृष्ट्या चालविण्यास आर्थिक धोकेदायक खासगी साखर  कारखान्यावर मात्र जिल्हा बँक मेहेरबान आहे. ही जिल्हा बँक शेतकरी, उत्पादक, सहकार क्षेत्राची की खासगी उद्योजकांची? जिल्हा बँक ही खासगी मालमत्ता म्हणून  यापूर्वी सुरेश जैन यांनी मनमुरादपणे उपभोगली व आता जणू पुन्हा तोच कित्ता गिरवला जातोय की काय, अशी भीती व्यक्त होतेय. आशा स्थितीत गिरीश महाजन  यांचा आक्षेप म्हणजे जणू संपूर्ण जिल्ह्यातील सभासद, शेतकरी, ऊसउत्पादक वर्गाच्या भावनांना मोकळी करून दिलेली वाटच जणू! शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनीही  या कर्जाबाबत रिझर्व्ह बँक व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.