Breaking News

अकोले महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू; 66 विद्यार्थ्यांची निवड

महाविद्यालय शिक्षणाबरोबर नोकरीचीही काळजी घेते - आंबरे

अकोले, दि. 24 - येथील अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयामध्ये सोमवार दि. 19 रोजी बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील नामांकित भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीने महाविद्यालयातील 89 विद्यार्थ्यांपैकी 16 मुली व 50 मुले असे 66 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 
सदर मुलाखतीसाठी भारत फोर्ज कंपनीचे एचआर मॅनेजर जितेंद्र झोपे व प्रॉडक्शन डेप्युटी मॅनेजर संतोष साके हे उपस्थित होते. मुलाखतीच्या सुरुवातीस प्लेसमेंट ऑफिसर रमेश रासकर यांनी कंपनीची माहिती दिली. तसेच निवड होणार्‍या विद्यार्थ्यांना या कंपनीत चांगले भवितव्य असल्याचे सांगितले. एचआर मॅनेजर झोपे यांनी निवड होणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचे कसब दाखवावी व कंपनीच्या भरभराटीमध्ये योगदान द्यावे. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी भारत फोर्जमध्ये चांगले काम करीत असल्याने आम्ही या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देत आहोत.
संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे पा. म्हणाले की, संस्था ही विद्यार्थ्यांना नुसतेच शिक्षण देत नसून त्यांच्या नोकरीचीही काळजी घेत आहे. आयटीआयमध्ये अनेक कंपन्या मुलाखतीसाठी येत असून त्यांच्या माध्यमातून आज भारत फोर्ज ही कंपनी अकोलेसारख्या ग्रामीण व आदिवासी भागात विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी या सामाजिक भावनेतून काम करीत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विश्‍वासाला तडा जावू देवू नये असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, खजिनदार एस. पी. देशमुख, आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय ताकटे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. संदेश कासार यांनी केले. तर आभार रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख व समन्वय प्रा. सुरेश मालुंजकर यांनी मानले. मुलाखतीचे यशस्वितेसाठी प्रा. महेंद्र बाणाईत, प्रा. पंकज नाईकवाडी, प्रा. अरुण वाकचौरे, प्रयोगशाळा परिचर नारायण छल्लारे, कैलास भालेराव, काशिनाथ साबळे, शिवदास बंगाळ आदींनी परिश्रम घेतले.