Breaking News

भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांच्या 3 हजार सैनिकांची तुकडी तैनात

नवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीममध्ये भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांनी 3 हजार सैनिकांची तुकडी या भागात तैनात केली. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी  काल(29 जून) गंगटोक येथील 17 माऊंटन डिविजन आणि कालीमपाँग येथील 27 माऊंट डिविजनच्या मुख्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
याप्रकरणी लष्कराक़डून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ट्राय जंक्शन येथे लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र डोकलाम येथे जवानांना अनेक  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र तरीदेखील दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीत. दोन्ही सैन्याच्या लष्करी अधिका-यांमध्ये ध्वज बैठका आणि अन्य  पातळीवर चर्चा झाली. मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.
आपल्या भेटीत रावत यांनी 17 डिविजनच्या तैनातीचा आढावा घेतला. या डिविजनकडे पूर्व सिक्कीमच्या संरक्षणाची जबाबदारी असून, या डिविजनच्या चार ब्रिगेडमध्ये  प्रत्येकी तीन हजार जवान आहेत.  चीन डोकलाम येथे क्लास-40 रस्ता बांधण्याची योजना आखत आहे. युद्धकाळात या मार्गावरुन चीनची 40 टन वजनाची लष्करी  वाहने सहज ये-जा करु शकतात. ज्यामध्ये हलक्या रणगाडयांचा समावेश होतो.