Breaking News

’स्मार्ट सिटी’ अंतर्गत पिंपरी-चिंचवडला मिळणार 300 कोटींचे अनुदान

पुणे, दि. 25 - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या यावर्षीच्या अनुदानासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराची आज निवड झाली. त्यामुळे स्मार्ट  सिटी योजनेतील प्रकल्प राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात पिंपरी चिंचवडला 300 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अनुदान स्पर्धेत  सहभागी देशभरातील एकूण 30 शहरांतून पिंपरी चिंचवडला 18 वा क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला  आहे.
केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शंभर शहरांना स्मार्ट सिटी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहराचा समावेश  असावा, अशी येथील जनतेची मागणी होती. त्यानुसार स्मार्ट सिटी योजनेत समावेशासाठी दोन्ही महापालिकांनी प्रस्ताव पाठविले होते. पूर्वीच्या जेएनएनयुआरएम  योजनेत या दोन्ही शहरांचा संयुक्त समावेश करण्यात आला होता. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेसाठी देखील पुणे आणि पिंपरी चिंचवडचा संयुक्त प्रस्ताव पाठविण्यात  आला होता. त्यातील पुणे शहराचा स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.