Breaking News

नगर तालुक्यात आरोग्य विभागाच्या कारवाईत बोगस डॉक्टर गजाआड

अहमदनगर, दि. 25 - कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतानाही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणा-या नगर तालुक्यातील नांदगाव येथे एका बोगस डॉक्टरचा  आरोग्य विभागाने पर्दाफाश केला असून एमआयडीसी पोलीसांनी या बनावट डॉक्टरला गजाआड केले आहे. आरोग्य विभाग व पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई  केल्याने एका मुन्नाभई डॉक्टरची पोलखाल झाली आहे.
अपूर्व वैद्यनाथ मंडल(वय 40)असे पोलीसांनी अटक केलेल्या या बोगस डॉक्टरचे नाव आहे.नगर तालुक्याच्या आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांना नांदगाव येथे एक  व्यक्ती कोणत्याही वैद्यकीय पदवी शिवाय डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे ज्योती मांडगे,गटविकास अधिकारी  वसंत गारूडकर यांच्यासहीत आरोग्य विभागाचे देहरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत सदाफुले व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक  देविदास नारकर यांच्या पथकाने नांदगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे असलेल्या मंडल याच्या दवाखान्यावर छापा घातला.यावेळी केलेल्या तपासणीत  त्याच्याकडे चौकशी केली असता कोणतीही पदवी नसल्याचे उघड झाले.पोलीसांनी मंडल याच्या या बोगस दवाखान्यातून स्टेथास्कोप,बीपी तपासण्याचे मशीन,काही  गोळ्या व इंजेक्शन असे साहित्य जप्त करून अपूर्व मंडल याला तातडीने अटक केली.वैद्यकीय अधिकारी श्रीकांत सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी  पोलीस ठाण्यात अपूर्व मंडल याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.