Breaking News

राज्य पुरस्कारप्राप्त ’रेडू’ चित्रपटातील ’करकरता कावळो’ गाणे सादर

मुंबई, दि. 06, मे - लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या 18 मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त ’रेडू’ या सिनेमातील, ’करकरता कावळो’ हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले. या गाण्याचे लेखन आ णि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचे असल्यामुळे, हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक क लाकारांकडून हे गाणे गाऊन घेतले असल्यामुळे, या गाण्यात ’कोकणचो धम्माल’ सिनेप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

ग्रामीण जीवनातील हलकेफुलके विनोद मांडणा-या या सिनेमात मराठी-मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गाने नटलेल्या कोकणी संस्कृतीशी जवळीक साधण्याची नामी संधी ’रेडू’च्या निमित्ताने शहरी प्रेक्षकांना मिळणार आहे. शशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात रेडियोची गमतीदार गोष्ट सांगण्यात आली आहे.’करकरता कावळो’ या गाण्यामध्येदेखील ही मज्जा दिसत असून, सामान्य माणसाच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण या गाण्यात टिपले आहे.
सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित ’रेडू’ या सिनेमाला नुकत्याच झालेल्या 55 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात आणि दिल्लीतल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होत असलेला हा ’रेडू’ चांगलाच आवाज करणार, यात शंका नाही.