एसटीला खासगी मिनीबसची धडक, पंधरा जण जखमी
रत्नागिरी, दि. 25 - रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर खेडशी नाक्याजवळ एसटीवर खाजगी मिनी बस आदळून झालेल्या अपघातात पंधराजण जखमी झाले. त्यातील मिनीबसचालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. या अपघात प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी-कोल्हापूर एसटी बस घेऊन चालक सदाशिव काशिनाथ सुतार सकाळी साडेअकरा वाजता निघाले होते. पावणेबारा वाजण्याच्या सुमारास खेडशी नाका येथील गतिरोधकाजवळ समोरून आलेल्या मिनी बसने एसटीला जोरदार धडक दिली. मिनीबस वेगात असल्याने दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. दोन्ही गाड्यांचे दर्शनी भाग एकमेकांमध्ये अडकले होते. मिनीबस चालक दीपक वीरकर गाडीमध्येच अडकले होते. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविले. अपघातात तुषार पवार (वय 19, रा.सातारा), स्वाती अरुण पाटील (31 रा.पन्हाळा), विश्वनाथ गोपाळ कणगेकर (54), एकनाथ शांताराम साळवी (35, रा. चिपळूण), एसटी चालक सदाशिव काशिनाथ सुतार (30, कोल्हापूर), कशाप्पा खरे (52 रा. जत), आनंदा बाबुराव पाटील (49, रत्नागिरी), बाबू रामजी चव्हाण (50 रा.विजापूर), सतीश लालसिंग राठोड (25 रा.विजापूर), अस्मिता सतीश पवार (17, पानवळ), सुलताना इब्राहिम बांगी (52, कुरधुंडा), आनंदी चंद्रकांत चव्हाण (60 रा.पाली), वसंत नारायण सावंत (72), वनिता वसंत सावंत (दोघेही रा.शिपोशी) मिनी बस चालक दीपक वीरकर असे एकूण पंधराजण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रमीण पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्या. विभाग नियंत्रक सौ.अनघा बारटक्के, विभागीय वाहतूक अधिकारी प्रकाश रसाळ, आगार व्यवस्थापक श्री.सय्यद यांनी अपघात स्थळासह जिल्हा रुग्णालयात जाऊन चौकशी केली. एसटीतील प्रवाशांना तातडीची मदत एसटीमार्फत देण्यात आली आहे.