आफ्रिकेत रंगणार ‘टी20 ग्लोबल लीग’ !
जोहान्सबर्ग, दि. 02 - ‘आयपीएल’च्या धर्तीवर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने नवीन टी20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ही स्पर्धा होणार असून ‘टी20 ग्लोबल लीग’ असे या स्पर्धेचे नाव असणार आहे. स्पर्धेत आठ संघाचा सहभाग असेल. फ्रँचायजी पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाईल. बुधवारी मंडळाकडून स्पर्धेचे नाव आणि बोधचिन्ह याचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेचे नाव आधी ‘टी20 ग्लोबल डेस्टीनेशन लीग’ असे ठेवण्याचा प्रस्ताव होता. मात्र ते नाव कमी करून आता केवळ ‘टी20 ग्लोबल लीग’ असे ठेवण्यात आले आहे. तर ‘डेस्टीनेशन’ शब्दाबाबत बोधचिन्हात चित्रात्मक संदर्भ देण्यात आला आहे.
