निर्णायक सामन्यात इंग्लंडचा आफ्रिकेवर 19 धावांनी विजय
कार्डिफ, दि. 27 - येथील तिस-या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने द. आफ्रिकेवर 19 धावांनी मात केली आणि तीन सामन्यांच्या मालिका 2-1ने जिंकली. निर्णायक सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या डेव्हिड मलान याने या संधीचे सोने करत 44 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 78 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकात 8 बाद 181 धावांची धावसंख्या उभारली. 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी अतिशय खराब खेळ केला. यष्टीरक्षक मंगालीसो मोशेलने सर्वाधिक 36 तर कर्णधार डिव्हिलियर्सने 35 धावा केल्या. मात्र या दोघांचे प्रयत्न फारस अपुरे पडले आणि आफ्रिकेच्या संघाला 7 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 162 धावाच करता आल्या. ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 3 बळी टिपले. नवोदित मलानला सामनावीर घोषित करण्यात आले.