महापालिका लोकसहभागातून लावणार पंधरा हजार झाडे
औरंगाबाद, दि. 31 - महापालिकेकडून पाच जूनला लोकसहभागातून 15 हजार वृक्षारोपण केले जाणार आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी आत्तापर्यंत लोकसहभागातून शहरातील ऐतिहासिक विहिरींतील गाळ काढणे, पालिका मुख्यालयातील इमारतींची रंगरंगोटी करण्याचे काम करून घेतले आहे. आता पालिका प्रशासनाने यंदाचा पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. पाच जून रोजी पर्यावरणदिनी शहरात वृक्षलागवडीची जम्बो मोहीम राबवून एकाच दिवशी 15 हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प आयुक्त मुगळीकर यांनी केला आहे. या दिवशी मनपाकडून शहरातील हर्सूल तलाव परिसरात उभारण्यात येत असलेल्या जांभूळबनात सुमारे दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शहरातील ज्या वसाहतीतून वृक्षारोपणाची मागणी करण्यात येईल, तेथे पालिकेकडून मोफत रोप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अयुक्त मुगळीकर यांनी सांगितले.