Breaking News

झिका विषाणूसंदर्भात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

अहमदाबाद, दि. 29 - गुजरातमध्ये झिका विषाणूंचे रुग्ण आढळले असून याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी चिंता व्यक्त करत यासंदर्भात आढावा  घेतला. 
राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. यापूर्वीही झिका विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आवश्यक  त्या सर्व उपाययोजना करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी चिंता करू नये, असे मुख्य आयुक्त जे. एन. सिंग यांनीही सांगितले. राज्यात या संदर्भात  आढळून आलेले रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर बापूनगर येथील या तिन्ही रूग्णांना झिका विषाणूची लागण झाल्याचे म्हटले आहे. अहमदाबाद येथील  बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेहत आरटी-पीसीआर चाचणीच्या माध्यमातून झिका विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. बी.जे. मेडिकल कॉलेजने 10  ते 16 फेब्रुवारी दरम्यान घेतलेल्या रक्त चाचणीत एका 64 वर्षीय जेष्ठ नागरिकामध्ये झिकाचे विषाणू आढळून आले. दुसर्‍या एका प्रकरणात 34 वर्षीय महिलेमध्ये  झिकाचे विषाणू आढळून आले. तिसर्‍या एका घटनेत जानेवारी महिन्यात एका 22 वर्षीय गर्भवती महिलेच्या रक्तात झिकाचे विषाणू आढळून आले.