Breaking News

लातुरचा पाणी पुरवठा विस्कळीत

लातूर, दि. 22 - मागच्या वीस दिवसांपासून लातुरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. धनेगावच्या मांजरा धरणातून पाणी उपसणारे तीन पंप आहेत. या पैकी  केवळ एक पंप सुरु आहे. एका पंपाने खेचले जाणारे पाणी लातुरला पुरत नाही. यासाठी नागझरी बांधावरुन पाणी आणणे हाच पर्याय आहे. नागझरी बांधावरील पंप  सुस्थितीत आहे. पण इथलं पाणी देण्यास शेतकरी तयार नाहीत. हे पाणी आम्ही पाटबंधारे विभागाकडून घेतले आहे, त्यासाठी पैसे मोजले आहेत असं शेतकरी  सांगतात. 
नागझरीतून पाणी घेण्यासाठी मनपाने पाटबंधारे विभागाची परवानगी मागितली तेव्हा पाटबंधारे विभागाने दोन महिन्यांसाठी पावणेचार लाखांचे बील होईल असे  सांगितले. हे बील त्वरेने भरु अशी ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. नागझरी बंधार्यात पाऊसकाळात साठलेले पाणी केव्हाच संपले होते. आज बंधार्यात  असलेले पाणी शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाकडे पैसे भरुन मिळवले आहे. या बंधार्यात आज साडेतीन मीटर पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले.एकून परिस्थिती  पाहता लातुरात पाण्यासाठी गेल्या वर्षासारखं जमावंदी कायदा करण्याची गरज भासण्यची शक्यता व्यक्त होत आहे.