Breaking News

जनकल्याणकडून एक लाख रुग्णांना रक्तपुरवठा

जालना, दि. 24 - येथील जनकल्याण रक्तपेढीने रूग्णांची रक्तासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी कुरिअर ब्लड सर्व्हिस सुरू केली असून त्याला चांगला  प्रतिसाद असल्याची माहिती रक्तपेढीचे सचिव पुसाराम मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिली रक्तपेढीच्या माध्यमातून वीस वर्षांत एक लाख दहा हजार रुग्णांना  रक्तपुरवठा करण्यात आला असून, 75 हजार दात्यांनी रक्तदान केले आहे. जनसेवेचे व्रत जोपासणार्या या रक्तपेढीच्या माध्यमातून थॅलेसेमियाग्रस्त 93 रुग्णांना मोफत  रक्तपुरवठा केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
जालना वैद्यकीय सेवा प्रतिष्ठानमार्फत 1997 पासून चालविल्या जाणार्या या रक्तपेढीला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त रक्तपेढीतर्फे राबविण्यात येणार्या  उपक्रमांबाबत मुंदडा यांनी माहिती दिली. या रक्तपेढीने 2004 पासून नवतंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. रक्तपिशवी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, पॅकरेड सेल, सिंगल डोनर  प्लेटलेट या सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी रक्तविघटन प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष मदत म्हणून पाच वर्षात दोन  हजार 382 रक्तपिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थिती बिकट असणार्या थॅलेसेमिया ग्रस्तांसाठी विशेष थॅलेसेयिा डे केअर सेंटरची स्थापना  करण्यात आली आहे. येथे 60 रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. असे ते म्हणाले, दीपक हॉस्पिटल, जालना हॉस्पिटल व ओममल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल येथे रक्त  साठवणूक केंद्रे सुरू केली आहे.