Breaking News

वाळू माफियांचा तलाठ्यावर प्राणघातक हल्ला

पुणे, दि. 27 - चोरटी वाळूवाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवल्याने लाटे येथील वाळू माफियांनी कोर्‍हाळे बुद्रुक येथील तलाठी अंकुश भगत यांना बेदम मारहाण केली. र  माफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वडगाव निंबाळकर पोलीसांनी याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही  घटना लाटे कोर्‍हाळे बुद्रुक मार्गावरील सावंतवस्तीत रात्री घडली.
थोपटेवाडी येथे तलाठ्यांचे काम चालु असताना सायंकाळी ट्रॅक्टर ( क्रमांक एमएच 42 6331 ) हा नीरा नदीच्या पात्रातून वाळु भरून कोर्‍हाळेच्या दिशेने घेऊन जात  असल्याची माहिती तलाठी भगत यांना मिळाली. सोबत कोतवाल व एका रेशन दुकानदाराला बरोबर घेऊन भगत यांनी थोपटेवाडी गावच्या हद्दीत ट्रॅक्टर अडवला.  चालकाकडे रॉयल्टीच्या पावत्या मागीतल्या. सदर वाळू अवैध असल्याची खात्री पटताच तलाठ्यांनी ट्रॅक्टर पोलीस ठाणेच्या दिशेने चालवला.
यावेळी चालकाने ही बाब आपल्या सहकार्‍यांना सांगितली. यावेळी 6 आरोपींनी एकत्र येऊन तलाठी भगत यांना लाथाबुक्क्यांनी व दगड गोट्यांनी मारहाण करत  अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. सोबत आलेल्या रेशन दुकानदाराला मारहाण केली. ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर उतरवून ट्रॅक्टर पळवून नेला. कोतवाल मात्र  बचावला. नागरिक मदतीला धावल्याने तलाठी बचावले. स्थानिकांनी तलाठी भगत यांना रुग्णालयात दाखल केले. तलाठ्यावर प्राणाघातक हल्ला झाल्याचे समजताच  तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी समीर हरिभाऊ खलाटे, अनिकेत अनिल निंबाळकर,  काका खलाटे, सचिन महादेव खलाटे, योगेश वसंत खलाटे, गोट्या खलाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी समीर खलाटे व अनिकेत निंबाळकर  यांना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत.